देवनार कत्तलखाना हायटेक होणार, बेकायदा कत्तलींनाही आळा बसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

जुन्या वाडय़ांची सुधारणा, नवीन बांधकामे, सुरक्षा रक्षक चौकी, आकर्षक प्रवेशद्वार यासह अद्ययावत सोयीसुविधा देवनार कत्तलखान्यात लवकरच करण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईत विनापरवाना सुरू असलेल्या कतलींना आळा बसणार आहे. कत्तलखान्याच्या आधुनिकीकरणामधील पहिल्या टप्प्यात हे काम करण्यात येणार आहे.

झपाटय़ाने होणारे शहरीकरण आणि वाढत्या मांस मागणीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून 1971 पासून देवनार कत्तलखाना सुरू करण्यात आला आहे. सुमारे 64 एकर परिसरात कारखाना, पशुधन बाजार केंद्र आणि चरण्यासाठी बखळ क्षेत्र अशी जागा विभागण्यात आली आहे. मात्र 1969-70 च्या दरम्यान उभारण्यात आलेल्या कत्तलखान्यातील बहुतांशी बांधकामे धोकादायक झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आले आहे. ही बांधकामे केवळ दुरुस्ती न करता तोडून पुन्हा नव्याने उभारण्याच्या सूचनाही ऑडिटमध्ये करण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर कत्तलखान्याच्या आधुनिकीकरणासाठी सल्लागार म्हणून मे. पेंटॅकल, मे. जि. के. सेन (जे.व्ही.) यांची नेमणूक करण्यात आली असून आधुनिकीकरणाचे काम मे. गिरीश एंटरप्राईजेसकडून करून घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. यामध्ये पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार तीन टप्प्यांत कामे केली जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील कामे
सध्याची जुनी दगडी भिंत पाडून ‘आरसीसी’ संरक्षक भिंत बांधणे
आकर्षक प्रवेशद्वार, सुरक्षा रक्षक चौकीचे बांधकाम
पर्जन्यजल गटारांची दुरुस्ती, नाला वळवणे
धोकादायक बनलेली बांधकामे तोडून जमीन सपाट करणे
जुन्या वाडय़ांची सुधारणा व दर्जा वाढवणे
दर्जेदार नव्या विद्युतीकरणाची व्यवस्था करणे