
मुंबई उच्च न्यायालयाकडून महापालिकेला दिलासा मिळाला आहे. कचऱ्याच्या विघटनासाठी अपुरी पडणारी जागा पाहता आणखी काही महिने देवनार डंपिंग ग्राऊंडचा वापर करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती पालिका प्रशासनाने हायकोर्टाकडे केली होती. पालिकेची ही विनंती मान्य करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने देवनार डंपिंगचा वापर तूर्तास जून 2020 पर्यंत करण्यास पालिकेला मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ देतानाच देवनारमधील घनकचऱयाचे प्रमाण कमी होण्यासाठी मुंबई महापालिका काय उपाययोजना करणार याबाबत मार्चपर्यंत सविस्तर माहिती देण्याचे आदेश हायकोर्टाने प्रशासनाला दिले.
मुंबईतील डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. मुंबईत दरदिवशी 10 हजार 500 मेट्रिक टन कचरा जमा होतो. मुलुंड डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्याने मुंबईचा 25 टक्के कचरा देवनार तर 70 टक्के कचरा कांजुरमार्ग येथे दररोज टाकला जातो. अपुऱ्या जागेची समस्या पाहता प्रशासनाने जून 2023 पर्यंत देवनार डंपिंग ग्राऊंडचा वापर करण्यास परवानगी हायकोर्टाकडे मागितली होती. या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदेची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. हायकोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत पालिकेला जूनपर्यंत देवनार डंपिंग ग्राऊंड वापरण्यास मुदतवाढ दिली व याचिकेवरील सुनावणी 3 जूनपर्यंत तहकूब केली.
न्यायालय काय म्हणाले...
‘पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार शास्त्रीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने घनकचऱयाचे विघटन करणे आवश्यक असून मुंबईसारख्या महानगरांमध्ये घनकचरा जमा करणे किती कठीण असते याची आम्हाला जाणीव आहे.’
‘देवनारमधील कचऱयाचे प्रमाण कशा प्रकारे कमी करणार त्याबाबत आराखडा महापालिकेने कोर्टात सादर करावा.’
‘भविष्यात देवनार डंपिंग ग्राऊंडची मूळ जमीन आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. कचऱयाच्या विघटनाबाबतच्या निविदांचा सविस्तर तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करा.’



























































