
देवरुख बाजारपेठेतील युवा व्यापारी शैलेश भोजने यांचे आकस्मिक निधन झाले या घटनेने देवरुख शहर हळहळले आहे. निधन कशाने झाले याचा डॉक्टर रिपोर्ट संध्याकाळी उशिरापर्यंत प्राप्त झाला नाही. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी गुरुवार २७ पासून गुरुवार ३ सप्टेंबर पर्यंत देवरुख बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
देवरुख नगरपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून व्यापारी, नागरीक, संस्था, संघटना यांच्या प्रतिनिधींना चर्चा करण्यासाठी बोलवले होते. याच बैठकीत शहरवासियांच्या आरोग्याच्या काळजीसाठी कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी आठ दिवसांचा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे व व्यापारी वर्गाने मोठी गुंतवणूक केली आहे याचा विचार करून गुरुवार पासून हा लॉकडाऊन होणार आहे.
या काळात मेडिकल दुकाने सुरु राहणार असून त्यांनी औषधांशिवाय इतर कोणतीही वस्तु विकू नये असे त्यांना कळवण्यात येणार आहे. तसेच दुध विक्रीसाठी दुकाने न उघडता जे होलसेल दुध विक्री करणारे डिलर आहेत त्यांनाच वेगळ्या वाहनातुन दुध विक्री करण्यास सांगण्यात येणार आहे व तशा जागा जाहीर केल्या जाणार आहेत. कोरोनाचे रुग्ण देवरुख परीसरात वाढत आहेत यासाठी व्यापारी वर्गानेही खबरदारी घ्यावी व ग्राहकांनाही गर्दी न करता शासन निर्णयाचे पालन करावे अशा सूचनाही देण्यात येणार आहेत. नगरपंचायतीतर्फे प्रत्येक प्रभागात जनजागृती करण्यात येणार आहे.
आरोग्यविभागही सतर्क झाला असुन ठिकठिकाणी सर्व्हे सुरु करण्यात आला आहे.
या चर्चेवेळी मुख्याधिकारी लोंढे, नगराध्यक्षा सौ.मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळे, आरोग्य अधिकारी रायभोळे, शिवसेना गटनेते वैभव पवार, सर्व नगरसेवक, सोळजाई देवस्थान अध्यक्ष बापु गांधी, संतोष लाड, अभिजित शेट्ये, क्रांती व्यापारी प्रतिनिधी निखिल कोळवणकर, देवरुख मधील व्यापारी हनिफ हरचिरकर,संजय राजवाडे, राजेश जागुष्टे, बाळु ढवळे, अप्पा सावंत, संजु पटेल, मुकुंद जोशी, आदिंसह व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.



























































