
शुक्रवारी रात्री दादर स्थानकाजवळ पद्दुचेरी एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस एकमेकांवर आदळून झालेल्या अपघाताची झळ दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांनाही बसली आहे. विभागीय ‘पीएसआय’ परीक्षा देऊन चांगल्या पदावर नियुक्त होण्याचे स्वप्न उराशी बाळगून घराबाहेर पडलेल्या उमेदवारांना आज रेल्वेच्या गोंधळामुळे परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
2017 नंतर अर्थात पाच वर्षानंतर विभागीय पीएसआय परीक्षा होत आहे. या परीक्षेची उमेदवार गेल्या अनेक वर्षांपासून तयारी करत होते. परंतु आज मध्य रेल्वे मार्गावरील गोंधळामुळे ठाणे-कल्याहून येणारे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकले नाहीत. विभागीय पीएसआय परीक्षेचा पेपर चर्चगेट येथील Sydenham College of Commerce and Economics येथे होणार होता. हा पेपर अकरा वाजता होता आणि विद्यार्थी साडे दहापर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
तोबा गर्दी
रेल्वेचे घसरलेले डब्बे पुन्हा रुळावर आणण्याचे काम रेल्वेने हाती घेतल्यामुळे पहाटे पासूनच मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. सर्व लोकल धीम्या गतीने पुढे जात असल्याने कुर्ल्याहून दादर गाठायला एक ते दीड तास लागत आहे. यामुळे प्रवासी चांगलेच हैराण झाले असून काहींनी रेल्वे मधून उतरून ट्रॅक वरून चालत जात पुढचे स्थानक गाठण्यात धन्यता मानली. या लोकल खोळंब्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती.
View this post on Instagram
माटुंगा स्थानकात एक्प्रेसची एक्प्रेसला धडक
दादर-पद्दुचेरी एक्प्रेसला मागून येणाऱ्या गदग एक्प्रेसने धडक दिल्याने पद्दुचेरी एक्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळांवरून घसल्याची घटना माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त असून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

































































