दापोली शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याचा त्रास दापोली शहरातील नागरिकांना तर सहन करावा लागतोच आहे शिवाय दापोली शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध सरकारी आस्थापनांमध्ये कामे करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्यांनाही याचा प्रामुख्याने त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे दापोली शहराला विशेष महत्त्व आहे. या शहराचा मोह ब्रिटीशांनादेखील आवरता आला नाही. म्हणून त्यांनी आपला सैनिकी कॅम्प येथे वसवला होता. दापोली शहर ही तालुक्याची व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे सामान खरेदीसाठी ग्रामीण भागातून दररोज येणाऱ्यांची संख्या अधिक असते. ऐतिहासिक बंदर असलेल्या दाभोळ हर्णे बुरोंडी या बंदरांकडे जाणारा मार्ग हा दापोली शहरातूनच जातो. पर्यटनदृष्ट्या दापोलीची ओळख पार सातासमुद्रापार पोहोचली आहे. अशा दापोलीने देशाला सर्वाधिक भारतरत्न दिलेली आहेत, असे असतानाही दापोलीतील रस्त्यांची सुधारणा करण्यास राज्य शासनाकडून निधी देण्यास आखडता हात घेण्याचे नेमके प्रयोजन काय, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

दापोली शहरातून आझाद मैदानाकडे केळसकर नाका येथून न्यायालयाच्या इमारतीच्या बाजूने जाणारा रस्ता इतका खराब झाला आहे की त्याला ओढयाचेच स्वरूप प्राप्त झालेले आहे तसेच मंडणगडकडून दापोलीकडे येणारा खोड्यंतील रस्त्याचीही दुर्दशा झालेली आहे त्याचप्रमाणे खेडकडून दापोलीत येणारा काळकाई कोंडावरील रस्त्याचीही दुरवस्था बघवत नाही. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील दयनीय अवस्था झाली असली, तरीही शासन याकडे लक्ष देत. दररोज येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे यामुळे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक, पादचारी करत आहेत.