माझे विधान राज्यपालांशी जोडू नका, राज्यपालांवरील टीकेवरून अजित पवार यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून महापुरुषांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला जातो. मी ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनाला आणून दिली. मी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे माझे ते विधान राज्यपालांशी जोडू नका, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महापुरुषांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले. उपमुख्यंत्री अजित पवार यांनीदेखील रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोणाचेही नाव न घेता नाराजी व्यक्त केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी अभिभाषण केले. विधानसभेत यावेळी गदारोळ झाल्याने राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट टाकून सभागृह सोडले. विधान परिषदेत आज अभिभाषण चर्चेसाठी ठेवल्यावर भाजप सदस्य अभिजीत वंजारी यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव मांडला. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावेळी अजित पवार यांनी राज्यपालांसंबंधी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मी कोणत्याही एका व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही. काही महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अशी विधाने होत आहेत. पंतप्रधानांना याबाबत केवळ सूचित केले, असे पवार म्हणाले तर महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी जबाबदारीने बोलायला हवे, असे मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडले.