पीक कापणीच्या प्रयोगासाठी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी शेतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, यवतमाळ

हंगामात नेमके किती उत्पादन होणार, याचा अंदाज बांधण्यासाठी पीक कापणी प्रयोग केला जातो. ही प्रक्रिया पूर्वी चावडीत बसूनच पूर्ण केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीक विमा व शासकीय मदतीला मुकावे लागत होते. हे टाळण्यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: शेतात जाऊन पीक कापणी प्रयोग केला. यावेळी महसूल व कृषी यंत्रणेचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

दारव्हा तालुक्यातील उजोणा येथील शेतकरी शशीधर उकंडा जाधव यांच्या शेत सर्व्हे नंबर ५५ मध्ये मुगाची पीक कापणी केली. उत्पादनाचा अंदाज ठरविण्यासाठी प्रत्येक गावात पीक कापणी समिती आहे. हा कार्यक्रम महसूल व कृषी विभाग संयुक्तपणे राबवितो. मात्र या समित्यांमधील प्रशासकीय यंत्रणा काम प्रामाणिकपणे करत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना उत्पादन कमी होऊनही मदतीपासून वंचित राहावे लागत होते. चुकीच्या पीक कापणीतून पैसेवारीचे गणित चुकत होते.

पाहा व्हिडीओ-

याला आळा घालण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी स्वत: मूग पिकाचा कापणी प्रयोग करण्यासाठी शेतात गेले. त्यांच्यासोबत अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी नागनाथ कोपळकर उपस्थित होते. मुगाच्या शेंगाची तोडणी करून त्याचे वजन करण्यात आले. सरासरी उत्पन्नाचे निकष ठरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कापणी प्रयोगात मुगाचे यावर्षी सरासरी इतके उत्पन्न होईल, असे प्राथमिक स्वरूपात स्पष्ट झाले. मात्र अंतिम पैसेवारीतून उत्पन्नाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

summary-deputy collector did harvesting test in yawatmal