
मध्य रेल्वेचा देशी जुगाड समोर आला आहे. रेल्वेच्या एसी लोकलबाबत सर्वसामान्य प्रवाशांमध्ये संपात असल्याने वारंवार तिच्यावर दगडफेकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे लोकलच्या डब्याच्या भल्यामोठय़ा काचांना तडे गेले आहेत. त्यामुळे सदरच्या काचा बदलणे आवश्यक असतानाही मध्य रेल्वेने तडे गेलेल्या जागी चिकट टेप लावल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तात्पुरती मलमपट्टी करून रेल्वे प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
उकाडय़ातून प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून मध्य रेल्वेकडून सध्या मेन लाईनवर सहा एसी लोकलच्या माध्यमातून दररोज 56 फेऱ्या चालवल्या जात आहेत. तिकीट जास्त असतानाही अनेक जण आरामदायी आणि सुरक्षित प्रवास म्हणून एसी लोकलला पसंती देत आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी एसी लोकलच्या काचांना तडे गेले आहेत किंवा फुटल्या आहेत त्या बदलणे आवश्यक आहे. पण रेल्वेने त्याकडे साफ दुर्लक्ष केले असून काच बदलण्याऐवजी त्या ठिकाणी चिकट टेप लावून काम चालवले जात आहे. त्यामुळे रंगाने देखणी असलेल्या एसी लोकलच्या काचा ठिकठिकाणी तडे गेलेले असल्याने आणि त्यावर लावलेल्या चिकटपट्टय़ांमुळे विचित्र दिसत आहेत. याबाबत मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता दर सहा-सात दिवसांनी गाडी सर्व्हिसला गेल्यानंतर तडे गेलेल्या काचा बदलल्या जातात, असे त्यांनी सांगितले.
गर्दीने अडवली ‘परे’च्या एसी लोकलची वाट!
मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलला प्रवाशांच्या गर्दीचा मोठा फटका बसू लागला आहे. सकाळी विरारहून 7.56 वाजता सुटणाऱ्या चर्चगेट एसी लोकलमध्ये आज मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे गाडीचे दरवाजे बंद होण्यास स्थानकात विलंब झाल्याने सदरची लोकल तब्बल 40 मिनिटे उशिराने धावत होती. आरपीएफ पोलिसांचा मदतीने गर्दी कमी केल्यानंतर दरवाजे बंद होऊन गाडी मार्गस्थ झाली, मात्र बोरिवली स्थानकातही तेच झाल्याने गाडीला विलंब झाल्याचे ट्विट एका प्रवाशाने केले आहे. गर्दीमुळे गाडीला विलंब झाला. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘परे’ने केले.



























































