धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडली

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर बुधवारी दोन बेवारस खोके आढळले होते. त्या खोक्यांमध्ये स्फोटके आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. एकूण 54 स्फोटके आढळून आली असून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ती जप्त केली आहेत. आरोपीचा शोध सुरू घेण्यासाठी सध्या रेल्वे पोलीस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एकवर दोन बेवारस खोके असून त्यात स्फोटकांसारखं काहीतरी असल्याची माहिती सफाई कर्मचाऱ्यांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले.