
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आजही शिवसैनिकांचा पाठिंबा आहे. पण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपायी शिवसेना पक्ष आणि शिवसैनिकांना पणाला लावून उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा थेट सवाल शिवसेनेचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना केला.
आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची उलटतपासणी झाली. सुरुवातीला सुमारे एक तास शिंदे गटाचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवली. त्यानंतर तीन तास देवदत्त कामत यांनी शेवाळे यांची उलटतपासणी घेतली.
शिवसेना सोडून भाजपला साथ देण्याच्या मुद्दय़ावरून देवदत्त कामत यांनी राहुल शेवाळे यांना प्रश्न केला. एकनाथ शिंदे यांनी आघाडीवर राहून पक्षाचे नेतृत्व केले नाही. पण स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपाटी शिवसेना पक्षनेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मुख्यमंत्री पदासाठी पक्ष व कार्यकर्त्यांना पणाला लावले हे खरे आहे का? त्यावर शेवाळे यांनी नाही, असे उत्तर दिले.
तारीख आठवली नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी 2018 रोजी एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली? असा प्रश्न देवदत्त कामत यांनी केला. त्यावर मला तारीख आठवत नाही, असे उत्तर राहुल शेवाळे यांनी दिले.
वकिलांच्या वादावर अध्यक्षांची नाराजी
शिंदे गटाचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी राहुल शेवाळे यांची साक्ष घेतली तेव्हा त्यांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर (लिडिंग) देवदत्त कामत यांनी आक्षेप घेतला. राहुल शेवाळे यांच्या उलटतपासणीतील महत्त्वाचे प्रश्न तुम्हीच विचारत आहात असे देवदत्त कामत यांनी अनिल साखरे यांच्या निदर्शनास आणले. त्यावरून दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये वादंग झाला. तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये हस्तक्षेप केला तुमच्या अनावश्यक वादामुळे कामकाजाचा वेळ वाया जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तेव्हा शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी प्रश्न मागे घेतला.
उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार
शिवसेनेशी बेईमानी करणाऱयांवर, मग ती व्यक्ती कितीही मोठी असू देत. अशांवर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने दिले आहेत आणि राष्ट्रीय कार्यकारिणी व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे असा ठराव मांडण्यात आला होता. त्यावेळी तुम्ही बैठकीला उपस्थित होतात याकडे देवदत्त कामत यांनी लक्ष वेधले तेव्हा या ठरावाशी मी सहमत नाही, असे शेवाळे उत्तरले.
शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता पद आहे का?
18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली आहे का? त्यावर 18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड झाल्याचे शेवाळेंनी सांगितले. त्यावर शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता पद आहे का? त्यावर शेवाळेंनी हो, असे उत्तर दिले. शिवसेनेत मुख्य नेता पद आहे हे तुम्ही घटनेत दाखवू शकतात का, असा प्रश्न देवदत्त कामतांनी केला तेव्हा मुख्य नेते पदाची घटना दुरुस्ती केली, असे उत्तर राहुल शेवाळे यांनी दिले. घटना दुरुस्तीबद्दल विचारले असता ‘मॅटर ऑन रेकॉर्ड’ असे शेवाळे यांनी उत्तर दिले.
























































