दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी द्या! मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

राज्यातील विविध भागांतील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला किमान आठ हजार कोटींची मदत द्यावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र सरकारकडे केली.

दुष्काळासह राज्यातील इतर विषयांवर केंद्राकडून मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची भेट घेतली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक असणारी रेल्वे मंत्रालयाची जमीन राज्य शासनास उपलब्ध करून देण्यासह जळगाव महानगरपालिकेला गृहनिर्माण व नगरविकास महामंडळाकडून (हुडको)कर्ज उपलब्ध करण्याबाबतही चर्चा झाली. या सर्व विषयांबाबत केंद्र शासन सकारात्मक असून रेल्वेचे अधिकारी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीनंतर दिली.