
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडा व चढ्ढा विकासक यांचा पी.पी.पी अंतर्गत एक संयुक्त प्रकल्प वांगणी येथे राबविण्यात येत आहे. म्हाडा प्राधिकरणाचे नाव व लोगो असल्यामुळे असंख्य ग्राहक येथे आकर्षित होत आहे. मात्र, लॉटरीधारकांकडून जाहिरातीमधील नमूद केलेल्या रकमेपेक्षा चार ते पाच लाख रुपये जास्त भरण्याकरिता विकासकाकडून दबाव टाकण्यात येत आहे. ग्राहकांची होणारी फसवणूक लक्षात घेता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने नुकतीच कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
वांगणीतील म्हाडा व चढ्ढा विकासक यांचा प्रकल्पाच्या जाहिराती वृत्तपत्र व रेडिओच्या माध्यमातून सगळीकडेच सध्या प्रसारित होत आहेत. परंतु म्हाडाच्या नावाचा वापर करून सदर विकासक ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात म्हाडा कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांची भेट घेतली. लॉटरीधारकांकडून जाहिरातीमधील नमूद केलेल्या रकमेपेक्षा चार ते पाच लाख रुपये जास्त भरण्याकरिता विकासकाकडून दबाव टाकण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाने बैठकीदरम्यान समोर आणले. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळापासून सदर प्रकल्प किमान दीड तासाच्या अंतरावर आहे परंतु जाहिरातींमध्ये ते अंतर फक्त तीस मिनिटे दाखवण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत म्हाडा प्राधिकरणाने सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने बैठकीदरम्यान केली.
सदर विषय गंभीर असून जर म्हाडा प्राधिकरणाच्या नावाचा गैरवापर होत असेल तर याबाबत म्हाडा निश्चितच कारवाई करेल. त्याचबरोबर मुख्य अधिकारी कोकण मंडळ यांनी सदर प्रकल्पातील विकासकाला या विषयासंदर्भात खुलासा मागवून त्यानंतर संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी शिष्टमंडळाला दिले. सदर शिष्टमंडळात कक्षाचे खजिनदार देवीदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, कक्ष विधानसभा संघटक प्रथमेश जगताप, किरण काळे व उपसंघटक विजय पवार उपस्थित होते.





























































