मंत्रिमंडळात सर्वांसाठी सीट नाहीत, इच्छुकांना फडणवीसांच्या कानपिचक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devendra fadanvis chief minister maharashtra

राज्यात नवे सरकार आल्यावर सर्वाच्या अपेक्षा वाढतात. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी 1200 अर्ज आले आहेत. पण आपल्याला काही जागा एकनाथ शिंदे गटाला द्यावा लागतील. मंत्रिमंडळ विस्तारातही जागा नाहीत, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे त्यागाची तयारी ठेवा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या पदाधिकाऱयांना व मंत्रीपदासाठी इच्छुकांना कानपिचक्या दिल्या.

पनवेलमध्ये आयोजित भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने झाला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱयांना पदांची अपेक्षा ठेवू नका असा स्पष्ट संदेश दिला. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी या सभागृहात किमान 200 पात्र उमेदवार आहेत, तर 1200 जण बायोडेटा देऊन गेले आहेत. सर्वांना उमेदवारी मिळणार नाही. राज्यपाल नियमांचा विचार करून या जागांवर निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी मेहनतीच्या आधारावर पुढे यावे. त्यांना त्यागाची भूमिका स्वीकारावी लागेल, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

मंत्रिमंडळात सीट नाहीत

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना फडणवीस यांनी मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्यांना सबुरीचा सल्ला दिला. मंत्रिमंडळ विस्तारात येऊ शकतील असे अनेक पात्र माजी मंत्री या सभागृहात आहेत, पण सर्वांचाच विचार करता येणार नाही. कारण तेवढी मंत्रीपदे नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत इच्छुकांना शांत बसण्याचा सल्ला दिला.

चोरीचा माल एकत्र आणून सरकार

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तेव्हा जनादेश चोरून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. आमच्या सोबत आलेले शिवसेनेचे 40 आमदार व भाजपच्या 106 आमदारांनी निवडणुकीत एकत्रित मते मागितली होती. जनतेने त्यांना एकत्रित निवडून दिले. पण लोकांनी निवडून दिलेले सरकार आणि जनादेशाची जी चोरी झाली तो चोरीचा माल एकत्र आणून सरकार स्थापन केल्याची कबुलीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.