फडणवीस सरकार राजभाषेत नापास, मंत्रालयात मराठीचा बट्टय़ाबोळ… सूचना फलकांवर चुकाच चुका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात राहता म्हणजे मराठी आलीच पाहिजे असे सांगत रिक्षा-टॅक्सी-कॅबचालकांसाठी ‘मराठीत बोला’ अशी सक्ती करणारे फडणवीस सरकार राजभाषेत नापास झाले आहे. मंत्रालयाच्या दारातच मराठीचा बट्टय़ाबोळ झाला आहे. मंत्रालयात अभ्यागतांच्या प्रवेशासासाठी लावलेल्या फलकांवर चुकाच चुका आहेत. मराठी भाषेच्या शुद्धलेखनासह वाक्यरचनेतही मातृभाषेचा बोजवारा उडाला आहे.

मंत्रालयात दररोज होणारी गर्दी कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कठोर नियमावली लागू केली आहे. त्यामुळे सहजासहजी मंत्रालयात जाणे सर्वसामान्यांसाठी मोठी कसरत ठरत आहे. असे असताना अभ्यागतांना देण्यात येणाऱया सूचनांमध्ये भाषेवरच घाला घालण्यात आला आहे. ‘मंत्रालय प्रवेशाकरिता दुपारी 2.00 वाजल्यापासून रांग येथून असेल’ असा फलक हवा असताना ‘मंत्रालय प्रवेशकरिता 02.00 वाजल्यांचे रांग येथून चालू’ असा सूचना फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर गेल्या कित्येक दिवसांपासून झळकत आहे. ‘सर्व कर्मचाऱ्यांनी मंत्रालयात प्रवेश करताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे.’ अशी अजब वाक्यरचना असलेला सूचना फलकही झळकत आहे. या घोडचुकांमुळे सरकारला मराठीचे धडे देण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

कुठे गेले मराठीचे कैवारी सरकारचे दुर्लक्ष

अभ्यागतांच्या प्रवेशासाठी लावलेल्या या फलकाजवळूनच शेकडो सरकारी कर्मचारी-अधिकारी दररोज ये-जा करतात, मात्र मराठीच्या चुकीच्या फलकावर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जात नाही. त्यामुळे प्रशासनाकडे मराठीच्या संरक्षण-संवर्धनाची जबाबदारी नाही का, असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. शिवाय मराठीप्रेमी म्हणवणारे सरकार कुठे गेले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.