‘मायबाप सरकार आम्हाला शिकू द्या’, देवळालीत लहानग्यांचा शाळा खासगीकरणाविरोधात निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अहो, मायबाप सरकार आम्हाला शिकू द्या, माझ्या बापाची नाही परीस्थिती शिक्षणाला खर्च करण्याची, माझी शाळा खासगी झाली तर होईल माझी शाळा बंद!’ असे सरकारला आवाहन करीत लहानग्यांनी सरकारी शाळा खासगीकरणाचा निषेध नोंदविला. सरकारच्या अध्यादेशाची पालकांसह विद्यार्थ्यांनी होळी केली. यावेळी लहानग्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱयांना निवेदन देऊन शाळा बंद न करण्याची विनंती केली.

देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या गेटवर राज्य शासनाने खासगीकरणाच्या काढलेल्या अध्यादेशाची होळी करून विद्यार्थी व पालकांच्या हस्ते देवळाली प्रवरा मंडलाधिकारी बाळकृष्ण जाधव व तलाठी दीपक साळवे यांना निवेदन दिले. यावेळी लहान विद्यार्थ्यांनी मंडलाधिकारी जाधव यांना ‘शासनाला सांगा आमच्या शाळेचे खासगीकरण करू नका? आमची शाळा बंद करू नका? अशी विनंती केली. यावेळी पालकांनीही शासनाने खासगीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

अमोल भांगरे, प्रमोद गाढे, भागवत देशमुख, ज्योती ढेरे, सोनाली टिक्कल, विजय पेरणे, योगिता लासुरकर, सदानंद चव्हाण, श्रीकांत जोशी आदींनी आपल्या भाषणातून शाळा खासगीकरणाला विरोध दर्शविला आहे. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेतील व उर्दू शाळेतील विद्यार्थी व पालक जालिंदर मुसमाडे, सुमित खांदे, नामदेव जंगले, परवीन शेख, लैला शेख, शीतल होले, रुपाली तेलोरे, शालन ताकवाले, आसराबाई हारगावकर, संदिप शेंडगे, फरजान तांबोळी, आफ्रिन सय्यद, आरती पंडित, रागिनी घुले, कल्पना घुले, भीमराज शेटे आदींसह पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.