
सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिनानिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिराला सजवण्यात आले असून मंदिर परिसरात शंभराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी वैद्यनाथ मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन काळजी घेतांना दिसत आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रभूं वैद्यनाथाला असलेला चांदीचा अलंकार देवस्थान ट्रस्ट कडून काढण्यात आला असल्याने यावेळी श्रावणात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 2 ऑगस्ट शुक्रवार रोजी श्रावण महिन्याला सुरुवात झाली .यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख आणि राजश्री देशमुख यांनी वैद्यनाथास ट्रस्टच्यावतीने रुद्राभिषेक केला. पहिला श्रावण सोमवार 5 ऑगस्ट रोजी असून 4ऑगस्ट रविवारी रात्री 12 वाजल्यापासुनच प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सुरु होणार आहे.
मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची झडती घेऊनच आतमध्ये सोडण्यात येईल. यामध्ये तिन्ही रांगांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर लावण्यात आलेले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी वैद्यनाथ मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त मंदिर प्रशासनाकडून आढावा घेतला. यावेळी परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी.के.शेळके तसेच वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख उपस्थित होते. यावेळी सुरक्षेबाबत स्वाती भोर यांनी योग्य ते निर्देश दिले,पोलीस प्रशासनाची तगडी सुरक्षा मंदिर परिसरात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
























































