
उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पाईसजेट एअरलाइन्सच्या 90 वैमानिकांना बोइंग 737 मॅक्स विमाने चालवण्यास बंदी घातली आहे. योग्य प्रशिक्षण घेतल्याशिवाय ही विमाने चालवू नका, असे फर्मान ‘डीजीसीए’ने काढले आहे. तसेच या वैमानिकांच्या प्रशिक्षणातील त्रुटींना जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे.
‘डीजीसीए’चे प्रमुख अरुण कुमार यांनी यासंबंधी बुधवारी एक निवेदन जारी केले. सध्या आम्ही 90 वैमानिकांना मॅक्स विमान चालवण्यास बंदी घातली आहे. त्यांना बोइंग 737 मॅक्स विमाने चालवण्यासाठी योग्य प्रशिक्षण दिले नसल्याचे आढळून आले आहे. या सर्व 90 वैमानिकांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावेच लागेल, असे अरुण कुमार यांनी स्पष्ट केले आहे. प्रवासी सुरक्षेच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. 13 मार्च 2019 रोजी इथियोपियन एअरलाइन्सचे 737 मॅक्स विमान अदिस अबाबाजवळ कोसळले होते. त्यात चार हिंदुस्थानींसह 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातानंतर तीन दिवसांनी बोइंग 737 मॅक्स विमानांच्या प्रवासी सेवेवर बंदी घालण्यात आली होती. पुढच्या काळात बोइंग पंपनीने मॅक्स विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा केली. त्यानंतर ‘डीजीसीए’ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बोइंग 737 मॅक्स विमानांवरील बंदी उठवली होती.
n स्पाईसजेटच्या एकूण 650 वैमानिकांना बोइंग 737 मॅक्स विमाने चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मात्र यातील 90 वैमानिकांच्या प्रशिक्षणातील त्रुटींवर बोट ठेवत ‘डीजीसीए’ने त्यांना 737 मॅक्स विमाने चालवण्यास मनाई केली आहे. हे वैमानिक इतर बोइंग 373 विमाने चालवू शकतील, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे.
























































