
धामापुर तर्फे संगमेश्वर येथे रविवारी झालेल्या दुर्घटनेनंतर बंधारा परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरात चार तरूणांचा बुडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या भोवती परिसरात तारेची कुंपण घालावी अशी मागणी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. दरम्यान बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांवर साश्रुनयनाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी सायंकाळी 4 वाजता धामापुर घारेवाडीतील औदुंबर प्रकाश पवार, शुभम शांताराम चव्हाण, राज तुकाराम चव्हाण, साहिल संतोष कांगणे, शैलेश दत्ताराम चव्हाण आणि चेतन सुर्यकांत सागवेकर हे सहा तरुण मौजमजा करण्यासाठी सदर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. सतत चार दिवस धामापूर परिसरात जोरदार पाऊस लागत असल्याने ओढे नाले तुडूंब भरुन वाहत असल्या कारणाने पाण्याचे स्तर वाढले होते, त्याचा अंदाज न आल्याने शैलेश दत्ताराम चव्हाण व चेतन सूर्यकांत सागवेकर हे पाण्यात बुडाले
गेल्या वर्षी 18 जुलैलाच यश रविंद्र महाडिक आणि विजय विश्वास भालेकर या दोन तरुणांचा गायमुख या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना स्मरणात असतानाच गेल्या रविवारी १८जुलै रोजी चेतन सूर्यकांत सागवेकर आणि शैलेश दत्ताराम चव्हाण या दोन तरुणांचा बुडून अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेबाबत माखजन करजुवे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या बंधाऱ्यात चौघांचा बूडुन मृत्यू झाला तो बंधारा चार वर्षापुर्वी एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातुन बांधण्यात आला आहे. ह्या बंधाऱ्यावर 18 लाख रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती पाणलोट समितीचे अध्यक्ष अनंत गुरव यांनी दिली. बंधारा बांधण्यापुर्वी ग्रामस्थ,शेतकरी यांच्या सुरक्षिततेचा कृषीविभाग प्रशासनाने विचार करायला हवा होता मात्र तसे दिसून येत नाही. ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी ग्रामस्थांना धोक्याची सुचना करणारे फलक लावले आहे, परंतू ग्रामस्थ व शेतकऱ्यांची जनजागृती करायला हवी होती ती होत नाही असे ग्रामस्थ सांगतात.
रविवारच्या दुर्दैवी घटनेने सदर गायमुख बंधारा पुन्हा चर्चेत आला आहे. या बंधाऱ्याच्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा तालुका प्रशासनाने ग्रामस्थांची तसेच शेतकऱ्याची सुरक्षा लक्षात घेता उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी बंधारा व नालापात्राच्या भोवती तारेची कुंपण घालावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. सदर दुर्दैवी घटना घडल्यावर उपविभागिय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी धामापुर बंधारा येथे भेट देऊन पाहणी केली तसेच त्यांनी प्रशासनाला सुरक्षिततेबाबत महत्वाच्या सुचना केल्या आहेत.































































