
सुधीर नागापुरे । माजलगाव
प्रसूती दरम्यान बाळासह मृत्यू पावलेल्या येथील मीरा एखंडे या महिलेच्या मृत्यूस डॉ. सुर्यकांत साबळे व स्टाफ जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे तसेच शासनाने सातही मुलींची जबाबदारी घ्यावी व कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. महिला बालकल्याण मंत्राचा वरदहस्त डॉ साबळे यांच्यावर असल्याचा घणाघाती आरोपही मुंडे यांनी केला. मंगळवारी पती व आईविना पोरक्या झालेल्या सात मुलीची विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन केले.
28 डिसेंबर रोजी शहरातील समता कॉलोनी भागातील मीरा रामेश्वर एखंडे या महिलेस प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता बाळासह मिराचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणा झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांसह समाजातून पुढे आली होती. तर सोमवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शहरात येऊन एखंडे परिवाराचे सांत्वन केले.
या पत्रकार परिषदेस माजी मंत्री प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक, अॅड भानुदास डक, दयानंद स्वामी, डॉ भगवान सरवदे, उपसभापती निळकंठ भोसले यांची उपस्थिती होती.






























































