धनराज महाले शिवसेनेत, दिंडोरीत राष्ट्रवादीला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिंडोरीत राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार धनराज महाले यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे नाशिकच्या विद्यमान महापौर रंजना भानसी यांचे भाऊ दिलीप राऊत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी या दोघांचे शिवबंधन बांधून तसेच हाती भगवा देऊन स्वागत केले.

‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडलेल्या या प्रवेशावेळी शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. या प्रवेशामुळे दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे प्रवेश फायदेशीर ठरणार आहेत, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

नाशिक महापालिका सदस्यांकडून पूरग्रस्तांसाठी 5 लाख 55 हजारांचा मदतनिधी
यावेळी नाशिक महापालिका, जिल्हा परिषद सदस्यांकडून पूरग्रस्तांसाठी 5 लाख 55 हजारांच्या मदतनिधीचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे तांदूळ, गहू, बाजरी असे प्रत्येकी 200 किलो धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदतही पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आली.