मृतदेहावरुन राडा, हातावर गोंदलंय ‘श्री राम’ पण झालाय खतना

सामना ऑनलाईन । धनबाद

झारखंडमधील धनबाद येथे एका तरुणाच्या मृतदेहावरून राडा झाला आहे. तीन दिवसांपूर्वी या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. यात त्याचा चेहरा छिन्नविछिन्न झाला आहे. यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यातच तरुणाच्या हातावर ‘श्री राम’ असे गोंदलेले असल्याने हा मृतदेह आमच्या मुलाचाच असल्याचा दावा एका हिंदू कुटुंबाने केला आहे. तर मृत तरुणाचा खतनाही झालेला असल्याने तो आमचाच मुलगा असल्याचा दावा एका मुस्लीम कुटुंबाने केला आहे. यामुळे मृतदेहाची खरी ओळख पटवणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. दरम्यान, मृतदेहाची खरी ओळख शोधण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करावी लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

santosh-kumar

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरला एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. पण त्याची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात बेवारस म्हणून ठेवला होता. पण याच दरम्यान उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे राहणाऱ्या जब्बार अली यांना एक फोन आला. समोरील व्यक्तीने तुमच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे अली कुटुंबाने पोलिसात धाव घेतली व गेल्या तीन दिवसांपासून मुलगा बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना तरुणाचा मृतदेह बघून ओळख पटवण्यास सांगितले. पण मृतदेहाचे चेहरा छिन्नविछिन्न झाल्याने त्याच्या शरीरावरच्या खुणांवरुन अली कुटुंबाने तो आमचा मुलगा जुमारती असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार केल्यानंतर ते पुढील विधी करण्यासाठी मृतदेह घेऊन गेले.

jumrati

याच दरम्यान, गिरीडीह जिल्ह्यात राहणारे वृद्ध बाल किशन शर्मा पोलीस ठाण्यात धडकले. तुम्हाला सापडलेला मृतदेह माझा मुलगा संतोषचा असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच संतोषच्या हातावर ‘श्री राम’ असे गोंदलेले असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. हे ऐकताच पोलिसांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर पोलिसांनी सर्व नाक्यारील पोलिसांना मृतदेह नेणारी अॅम्बुलन्स ताबडतोब थांबवण्याच्या व मृतदेह पोलीस ठाण्यात घेऊन येण्याच्या सूचना दिल्या. यामुळे जब्बार यांची अॅम्बुलन्स पोलिसांनी थांबवली. यावरून जब्बार व पोलिसांमध्ये वादही झाला. पण अखेर मृतदेह पोलीस ठाण्यात आणण्यात आला. तेथे शर्मा य़ांनी हा संतोषचाच मृतदेह असल्याचे सांगितले. तसेच त्याचे आधार कार्ड, पॅन कार्डही पोलिसांना दाखवले. हे बघताच जब्बार यांनीही मृतदेह जुमारतीचाच असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याचे ओळखपत्र दाखवले. यामुळे पोलीसही चक्रावले. मृतदेहाच्या हातावर ‘श्री राम’ गोंदलेले असल्याने तो हिंदू असून शर्मा यांचाच मुलगा असावा असे पोलिसांना वाटले. पण त्याची खतनाही झालेली असल्याने तो जब्बार यांचाही मुलगाही असू शकतो, असे पोलिसांना वाटले. पण शरीरावरील खुणांवरुन काहीच सिद्ध होत नसल्याने अखेर मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

summary-dhanbad- body claimed by hindu and muslim family