सामना ऑनलाईन । मुंबई
मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र या सवलती धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत लागू असतील असेही त्यांनी सांगितले. शनिवारी कॅबिनेट सब कमिटीची बैठक पार पडली. सब कॅबिनेट बैठकीला चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, राम शिंदे, महादेश जानकर, एकनाथ शिंदे, विष्णू सावरा, संभाजी पाटील-निलंगेकर यांची उपस्थिती होती.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, टीआयएसएसच्या अहवालावर पुढची कारवाई करण्यासाठी तो आम्ही अॅडव्होकेट जनरलकडे पाठवत आहोत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात अॅफिडेव्हीट दाखल करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी समाजाला ज्या योजना लागू आहेत त्या धनगर समाजाला आता लागू करण्याचा निर्णय घेतला आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गरीब धनगरांसाठी आदिवासींप्रमाणे आश्रमशाळा, तसेच हॉस्टेल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच धनगर समाजाच्या मुलांना आदिवासींप्रमाणे प्री मॅट्रीक आणि पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ज्या दुर्गम भागातील मुलांना हॉस्टेलला प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी आदिवासींप्रमाणे ‘स्वयंम’ योजना धनगर समाजातील मुलांना लागू करण्यात आली आहे. तसेच नामांकित शाळांमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील धनगर मुलांना प्रवेश देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आदिवासींप्रमाणे भूमिहीन धनगरांसाठी शेतजमिनी खरेदीची योजना सुरू करण्यात येईल. तसेच शेळी-मेढी महामंडळाचा स्कोप वाढवत आहोत. त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेढी महामंडळाऐवजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्योजकता विकास आणि शेळी-मेढी महामंडळ असे म्हटले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यामध्ये बिनव्याजी कर्जाच्या योजना सुरू करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
आदिवासी आणि शेड्यूल कास्टसाठी घरकूलची योजना चालवतो तशी योजना धनगर समासाठी चालवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबत अर्थसंकल्पामध्ये तरतूदही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच न्यायालयामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
सोलापूर विद्यापिठाचे नाव बदलणार
बऱ्याच काळापासून होत असलेल्या सोलापूर विद्यापिठाच्या नामांतराचा प्रश्नही मार्गी लागल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सोलापूर विद्यापिठाला आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत 5 मार्चला बैठक होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.





























































