500 चौरस फुटांचे घर मिळालेच पाहिजे, धारावीत 5 एप्रिलपासून आंदोलनाचा धडाका; धारावी बचाव आंदोलनाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीतील झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फुटांचे घर देण्याबाबत राज्य सरकार टाळाटाळ करत असल्यामुळे धारावीकरांमध्ये प्रचंड संताप आहे. धारावीतील सर्व झोपडपट्टीवासीयांना धारावीतच घरे देण्याचे ठोस आश्वासनही राज्य सरकार देत नाही. त्यामुळे आता ‘धारावी बचाव आंदोलन’ या संघटनेतर्फे 5 एप्रिलनंतर व्यापक आंदोलन धारावीत सुरू करण्यात येणार आहे.

धारावीतील झोपडय़ा अदानी कंपनी मोठय़ा प्रमाणात अपात्र करीत आहे. या प्रमुख मुद्दय़ाकडे राज्य शासन, एसआरएचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा प्रमुख उद्देश आहे. या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी धारावी बचाव आंदोलनाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी सायंकाळी धारावीत झाली. धारावीतील छोटय़ा उद्योगांसाठी स्वतंत्र उद्योग क्षेत्र तयार करा, कुंभार बांधव, कोळी बांधव, गणेश मूर्तिकार यांसारख्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाप्रमाणे जागा देण्यात याव्यात आदी धारावी बचाव आंदोलनाच्या मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता लेखी स्वरूपात जोपर्यंत अदानी पंपनी आणि राज्य सरकार करीत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन चालू राहील, असा इशारा दिला आहे.

सर्व लोकप्रतिनिधी आंदोलनात उतरणार

शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड यांच्यासह या आंदोलनात नगरसेवक जोसेफ कोळी, टी.एम. जगदीश, दीपक काळे व नगरसेविका अर्चना शिंदे आदी सहभागी होणार आहेत.