फ्रेंचायझी चुकले अन् खेळाडूंना त्रास झाला, स्पॉटफिक्सिंग प्रकरणावर पहिल्यांदाच धोनी बोलला

47

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

2013 सालात आयपीएलमध्ये झालेल्या मॅच फिक्सिंगने हिंदुस्थानीच नव्हे तर क्रिकेटविश्वाला हादरवून टाकले. काही क्रिकेटपटूंची कारकीर्द संपुष्टात आली. आता तब्बल सहा वर्षांनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने या प्रकरणावर मौन सोडले. या वेळी तो म्हणाला, आमच्या फ्रेंचायझीकडून चूक झाली हे मान्य आहे. पण त्यात खेळाडू सामील होते का? त्यांचा काय दोष होता? मग त्यातून आम्हाला का जावे लागले? असे प्रश्न त्याने उपस्थित करतानाच हा काळ जीवनातील सर्वात वाईट काळ होता. मी अत्यंत निराश झालो होतो, असे भावुक उद्गारही महेंद्रसिंह धोनीने काढले.

या प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्जवर सलग दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. पण या बंदीनंतर निराशा झटकून पुन्हा नव्या दमाने आम्ही मैदानात उतरलो, असे ‘रोअर ऑफ द लायन’ या लघुपटात महेंद्रसिंह धोनीने सांगितले. फिक्सिंग प्रकरणात माझेही नाव घेतले गेले. पण मॅचफिक्सिंगसाठी संघातील बहुतेक खेळाडू सामील असावे लागतात, असे महेंद्रसिंह धोनीने स्पष्ट केले.

पहिल्या सामन्याची कमाई शहीद जवानांना

चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्याची कमाई पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला. ‘सीएसके’ संघाची ही देशप्रेमाची जाण तमाम देशवासीयांसाठी नक्कीच अभिमानास्पद होय. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या