
सामना प्रतिनिधी । अलिबाग
मासे म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातच वळगणीच्या माशांची चव काही औरच असते. त्यामुळे खवय्यांनो आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर रायगडात चला. पहिल्याच पावसात रायगडातील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात वळगणीची चिवणी मिळू लागली असून गाबोळीने टरटरून भरलेल्या या माशांवर अक्षरशः उड्या पडत आहेत. शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपये वाट्याने मिळणाऱ्या या वळगणीचे मासे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतर खवय्यांना वळगणीच्या माशांची आठवण येते. जिह्यात वळगणीची मिळणारी चिवणी ही त्यातील महत्त्वाची ‘डिश.’ पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्याने साठवलेल्या मासळीचा दर अवाचे सवा असतो. त्यामुळे खाडी भागात मिळणाऱ्या वळगणीच्या मासळीचा अनेक जण फडशा पाडतात. पाऊस सुरू झाला की पहिल्या पंधरा ते वीस दिवस मासे समुद्रातून अंडी घालण्यासाठी खाडी परिसरात येतात. त्यावेळी कोळीबांधव ‘उक्षी’ लावून ते पकडतात. गाबोळीने भरलेली ही चिवणी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणाच्या बाजारात येऊ लागली असून त्यावर मासेप्रेमींची झुंबड उडत आहे.
तळलेले मासे आणि झणझणीत कालवण
पावसाळ्यात वळगणीचे मासे खाण्यासाठी मुंबई, पुण्यातील पर्यटक खास रायगडात येतात. गाबोळीने भरलेली चिवणी खायला फार चविष्ट लागत असल्याने पर्यटक चिवण्यांच्या तळलेल्या तुकड्या आणि झणझणीत कालवणावर अक्षरशः ताव मारताना दिसत आहेत.
































































