
देशातील पोस्ट ऑफिसमध्येही आता डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने नवीन खाते उघडण्यासाठी आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आता ओटीपी व बायोमेट्रिकच्या जागी फेस स्कॅनची सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा यूआयडीएआयच्या नियमांतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे आता बोटांचे ठसे किंवा ओटीपी देण्याचे टेन्शन राहणार नाही. ही नवीन सुविधा केवळ पैसे पाठवण्यासाठी नाही, तर अनेक बँकिंग सुविधेसाठी केली जाणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. देशातील 1.6 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये हे काम केले जाईल. डिजिटल बँकिंग सुविधा 13 भाषेत उपलब्ध आहे. यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगु, उर्दू, गुजराती या प्रमुख भाषेचा समावेश आहे. ही सुविधा सोपी आणि सुरक्षित आहे. तसेच आधारशी जोडली असल्याने फ्रॉड होण्याचा धोका नाही, असे पोस्ट खात्याने म्हटलेय.