लेख : नाच नाचूनि…

दिलीप जोशी

khagoldilip@gmail.com

मनभावन सूर आणि लय, तालावर पावलं थिरकणं ही कलासक्त मनाची सहजस्फूर्त प्रतिक्रिया असते. जरा आठवून पहा आवडीचं गाणं लागलं की, आपण नकळत कामाच्या टेबलावरही ताल धरतो किंवा पावलं आपोआप थिरकतात. हे अगदी किंचित काळ घडतं. कारण ती वेळ, जागा काही नृत्यसंगीताची मैफल नसते आणि आपणही कोणी कलाकार नसतो, परंतु एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळवून पदकं प्राप्त करता आली नाहीत तरी अनेक कला प्रकारांची आवड आणि त्यांना दाद देण्याची रसिकता मात्र आपल्यात असू शकते. आपलं असं रसिकत्व आपल्यालाच नव्हे तर कलावंतांनाही सुखावून जाते. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरचनेच्या आरंभीच म्हटलंय ‘वक्ता हा वक्ताचि नव्हे श्रोतेविण’ म्हणजे श्रोतेच नसतील तर उत्तम वक्ता किंवा कोणताही कलाकार ती सादर कोणासमोर करणार? तेव्हा आपल्यासारख्या सामान्यांचं कलेच्या प्रांतातील रसिकगण म्हणून मोल महत्त्वाचं असतं.

मात्र केवळ आत्मानंदासाठीही कलेची जोपासना करता येते. स्वतःपुरतं वाद्यवादन किंवा गाणं अथवा अन्य कलेत रमणारे अनेक असतात. त्यांना त्याच्या सादरीकरणाची ओढ नसते. आपल्या मनाला आनंद मिळाला की, खूप झालं असं त्यांना वाटतं. काही का असेना, कोणतीही कला माणसाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे आनंद देते, प्रसन्न करते हे महत्त्वाचं.

सध्याचं जग ताणतणावाचं आहे. तथाकथित प्रगती खूप दिसतेय. अर्थात ही प्रगती पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसापर्यंत पोचलेली आहे असं अजिबात नाही. अंतराळात उड्डाण करण्याचं स्वप्न बघणारी माणसं जशी पृथ्वीवर आहेत तशीच आदिम अवस्थेत जेमतेम अन्न, वस्त्र्ा, निवाऱ्यानिशी राहणारी माणसंसुद्धा आहेत. ही विषमता तर विविध रूपात ठायी ठायी दिसते.

त्यातून प्रश्न येतो तो पूर्वीच समर्थांनी विचारलेला आहे ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ आणि त्यांनीच उत्तर दिलंय की ‘विचारी मना तूच शोधोनि पाहे’. विचारशील मनानेच या प्रश्नाचं खरं उत्तर शोधायचंय. ‘कसे आहात?’ या प्रश्नाला समोरची व्यक्ती किंवा आपणही अनेकदा ‘मजेत’ असं उत्तर सहजतेने देतो. त्याक्षणी ते ठीकच असतं, परंतु अंतर्मनात अनेक प्रश्न खदखदत असतात. काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह. मनावर ताण यायला नकारात्मक भाव अर्थातच अधिक कारणीभूत असतात. काही वेळा सगळं चांगलं चाललेलं असतं (किंवा भासतं) म्हणजे उत्तम नोकरी, भरपूर पैसा, सर्व काही, पण त्याचंही टेन्शन अनेकांना असह्य होऊ लागतं. यातून तरुण वयातच एक प्रकारची उदासीनता जाणवू लागते. ती नेमकी कसली ते समजत नाही, पण अस्वस्थता असते खरी. यावर उपाय म्हणजे चांगल्या सख्ख्या मित्रांशी संवाद साधून मनात साचलेल्या अस्वस्थतेचा निचरा (व्हेन्ट) करणं किंवा आवडतं संगीत ऐकणं, निसर्गाच्या सान्निध्यात फिरून येणं अथवा मंद तालावर नाचणं!

पाश्चात्त्य तरुणाईला क्लबमध्ये वगैरे नृत्याची सवय असते. आपल्याकडे दक्षिण हिंदुस्थानात पूर्वापार नृत्यपरंपरा घराघरात जोपासली गेली. ओडिशामध्येही अशी परंपरा मोठय़ा प्रमाणात आढळते. संगीत आणि नृत्य हा आदिमानवापासून ते प्रगत माणसांपर्यंतच्या भावभावनांचा आविष्कार आहे. आपल्याकडील अनेक आदिवासींचे विविध प्रकारचे नाच असतात. त्यांच्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर ते कधी महिन्यातून ठरावीक दिवशी तर काही आदिवासी रोज रात्री समूह नृत्य करतात. तनामनाचा थकवा घालवण्यासाठी आणि उद्याचा उत्साह वाढवण्यासाठी असं नृत्य पोषक ठरतं. आपल्याकडचं कोळीनृत्य, नवरात्रातील रासक्रीडा, गणपतीत लेझीमच्या तालावरचा नाच किंवा पंढरीच्या वारीत पाऊल  धरून ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात चाललेली दिंडी या साऱ्यामध्ये नृत्याचा अंतर्भाव आहे. मन प्रसन्न करणारा भावही आहे.

म्हणूनच मनःशांतीसाठी कुणीही पदन्यास करावा असं एक नवीन संशोधन म्हणतंय. त्यात नवीन काय म्हणा, पण ठरावीक लोकांवर प्रयोग करून पाश्चात्त्य मंडळी निष्कर्ष काढतात, मग त्याला संशोधन म्हणावं लागतं. ते चांगलं आहे एवढं मात्र खरं. मनाची उदासीनता उतारवयात अधिक सतावू लागते हे खरंच. तरुण वयात टेन्शन येतं तसं जातंही, पण ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असं वाटू लागलं की, पंचाईत होते. या वाढत्या वयातल्या निरोगी लोकांचे म्हणजे साठ ते सत्तर वयोगटातल्या आजी-आजोबांचे तीन गट करून त्यांना जलद चालणे, थोडा व्यायाम आणि हलकं, मंद नृत्य अशी कामं देण्यात आली. त्यापैकी मंद नृत्य करणाऱ्यांची उत्साहाची, प्रसन्नतेची पातळी सर्वाधिक भरली. कदाचित आपणही या वयात नाचू शकतो या कल्पनेनेच असेल, पण ही ज्येष्ठ मंडळी सुखावली. उदासीनतेचं मळभ मनावरून दूर झालं तर संध्याछायासुद्धा ‘सुखविती हृदया’ असं म्हणता येईल. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांना भेटलो होतो. मुलाखत झाल्यावर ते म्हणाले, ‘उद्याच्या कार्यक्रमाला या’ आणि त्या कार्यक्रमात त्यांनी अप्रतिम ‘गोंधळ’ केला. गोंधळ नृत्यात लीलया थिरकणारी त्यांची पावलं त्यावेळी शंभर वर्षांची होती आणि आम्ही सारेच नतमस्तक झालो होतो.