अभिनयाचा गौरीशंकर हरपला! दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

अखेर अभिनयसूर्य दिलीप कुमार ऊर्फ युसुफ खान सरवर खान पठाण अस्ताला गेला. गेली काही वर्षे तो असून नसल्यासारखाच होता. कोणाला ओळखत नव्हता. त्याच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला त्याची सात चित्रपटांची नायिका वैजयंतीमाला उपस्थित होती. तिला न ओळखता दिलीप कुमारनं निर्जीव व यांत्रिकपणे तिच्याशी हस्तांदोलन केले होते. त्याचा ‘झोंबी’ झाला होता. अगदी अखेरच्या दिवसात तो सायरा बानूलाही ओळखेनासा झाला होता. मृत्यूची पावलं त्याच्या बिछान्यापर्यंत पोहोचली होती. मृत्यूचे हात त्याच्या गळय़ाभोवती आवळले गेले होते. आपण असहायपणे हे सगळे बघत होतो. राम-कृष्णही होऊन गेले तिथं मर्त्य मानवाचं काय? दिलीप कुमार हा मर्त्य मानव होता हेच मुळात आम्हाला कधी कळलं नाही. निदान जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तो असणार होता. तसा आमच्यात करार झालेला होता. आज त्यानं करार मोडला. आम्ही आहोत; तो नाही.

शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर व दिलीप कुमार एकच झाले. एकदाच झाले. कायम एकच राहिले. एकमेवाद्वितीय! झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परि यासम हा! हे वर्णन ज्यांना चपखल बसतं ती ही अलौकिक, अनुपम रत्नं. दुसऱया लता मंगेशकर आपण पुष्कळ पाहिल्या, पण त्या दुसऱया राहिल्या नाहीत; मग पहिलीला आव्हान देणं दूरच. दुसरे दिलीप कुमारही झाले, पण पहिला पहिलाच राहिला. त्याच्या स्थानाला कोणी यत्पिंचितही धक्का पोहोचवू शकला नाही. साक्षात अमिताभ बच्चन म्हणाला होता की, दिलीप कुमारचा कुठलाही सीन पाहताना तो यापेक्षा चांगला होऊ शकेल असं वाटतच नाही. अमिताभ असंही म्हणाला होता, ‘माझ्या पिढीतील किंवा पुढल्या पिढीतील कोणी तर असं म्हणत असेल की, दिलीप कुमारकडून त्यानं काहीही घेतलेलं नाही, तर मी म्हणेन की तो खोटं बोलतोय.’

‘चंद्र नभीचा ढळला की सूर्य मावळला’ अशी काहीशी प्रतिक्रिया लता मंगेशकरनं महंमद रफीच्या निधनानंतर मला दिली होती. आज दिलीप कुमार गेल्यावर माझे शब्दच गोठलेत. आयुष्यभर शब्दांच्या दुनियेत राहिलो आणि अशा बिकट प्रसंगी तेच साथ सोडून गेलेत. कारण त्याच्याविषयीच्या भावना, प्रेम व कृतज्ञता शब्दातीत होती, मला तो कायम माझ्या कुटुंबातीलच एक वाटत आला. अन् इतक्या जवळच्या माणसाच्या जाण्यावर आपण त्रयस्थासारखी प्रतिक्रिया थोडीच देत असतो? ‘अंदाज’मध्ये वडिलांच्या निधनानं शॉकमध्ये गेलेल्या नर्गिसला माणसात आणण्यासाठी ‘रो इनके लिये, नीना रो इनके लिए’ असं रुद्ध कंठानं म्हणत त्याचेच डोळे पाझरतात. त्याची आठवण झाली.

पण न सांगता न सवरता न निरोप घेता, ‘खुदा हाफिज’देखील न म्हणता तो असा गेला? सगळेच कधी न कधी जातात म्हणून दिलीप कुमारनंसुद्धा जायचं? शंभरीच्या जवळ कोण जातं असं त्याच्या जाण्याचं तुम्ही तर्कशुद्ध समर्थन करणार आहात की काय? तो का गेला? तो 98 वर्षांचा होता. कबूल. पण तो का गेला? गेली अनेक वर्षे तो किडनीच्या दुर्धर विकारानं ग्रस्त होता, कबूल. पण तो का गेला? त्याला स्मृतिभ्रंश झाला होता, कबूल. पण तो का गेला? तो माणसं- अगदी सायरालादेखील ओळखत नव्हता, कबूल. त्याला कशाचंच भान नव्हतं, कबूल. पण तो का गेला? तो गेला नव्हता म्हणून होता, कबूल. पण तो का गेला? त्याला पुढे कोणी नसेल, पण मागे आम्ही होतो नं?
मग तो का गेला…?

त्याचे जुने चित्रपट मी वेचून वेचून ‘मॅटिनी’ला पाहिले होते. प्रत्येक वेळेला त्याच्या अभिनयनैपुण्यात मी दिकून गेलो होतो. ‘बाबुल’मध्ये तो ‘हॉड’ करीत नर्गिसच्या बोलण्याची थट्टा करतो त्यावरही मी लट्टू झालो होतो. खुर्चीवर बसण्यापूर्वी तो सहज बोटानं धूळ आहे का बघतो. या सहजसुंदर अभिनयानं मी प्रभावित झालो होतो. ‘नया दौर’मध्ये जीवनशी एकाकी लढा देणाऱया दिलीप कुमारच्या मदतीला घमेलं घेऊन वैजयंतीमाला येते. तत्पूर्वी त्याचं बोलणंचालणं बंद असतं. वैजयंतीमाला (‘दुर्गा मावसीवाली रजनी’!) बिकट प्रसंगी बाजूनं उभी राहिल्याचे पाहून दिलीप कुमाचा गळा भावनातिरेकानं दाटून येतो. तो आधी खाकरून घसा मोकळा करतो व मग बोलतो. हा अत्यंत नैसर्गिक अभिनय या माणसानं चौसष्ट वर्षांपूर्वी केला होता. शब्द त्याच्या तोंडून येत तेव्हा शब्दांच्या पलीकडलं ते खूप काही सांगून जात. ‘सुव्वर को हाथ नही लगाते, दूरसे ही मारते है’ असं रानडुकराच्या शिकारीची अॅक्शन करीत तो ‘दुनिया’त प्रेम चोप्राला म्हणतो तेव्हा त्याच्या मनातील सगळी घृणा अक्राळविक्राळ स्वरूपात बाहेर येते. ‘देवदास’मधला ‘कोन कंबख्त है जो बरदाश्त करने के लिये पीता है!’ हा प्रसंग तर अभिनयाचा घडा मानला गेलाय. ‘हां, तो हाथ पकड ले किसी का. जा हाथ पकड ले. दूसरे गाववालों का साथ देती है गद्दार!’ (‘गंगा जमना’) हा संवाद त्याच्या तोंडून ऐकलाय नं? ‘अब ना बादल गरजेंगे, ना बिजलिया चमकेगी’ हे तो ‘तराना’मध्ये कसं बोललाय ऐका. मग तो मधुबालाला जेव्हा म्हणतो की तुम्हारी ये बार बार चिल्लाने की आदत है न, तुम्हे छोडनी होगी.’ तेव्हा ‘छोड दुंगी’ असं म्हणण्यावाचून मधुबालाला गत्यंतर नसते, असेच बघताना आपल्याला वाटते. ‘भाई के मौत के साये मे बहेन शादी रचाय तो लोग क्या कहेंगे?’ इतक्या छद्मीपणे बोललाय की त्यावर वहिदा रहेमानने मान खाली घालणंच उचित वाटायला लागतं. ‘लीडर’मध्ये ‘टाइट’ अवस्थेत ‘हम शराब पियेगा तो ममी गुस्सा करेगा’ हे जयंतसमोर बोलून त्याने बहार उडवून दिली होती. ‘मशाल’मध्ये ‘गाडी रोको भाई, तुम्हारे बच्चे जिये. अरे, वो मर रही है…’ हा विलाप करताना त्यानं घशात अवंढा आणला होता.

वास्तविक दिलीप कुमार हा खऱया अर्थाने माझ्या पिढीचा नट म्हणता येणार नाही. त्याचा पहिला चित्रपट ‘ज्वारभाटा’ (साल 1944) लागला तेव्हा मी जेमतेम एक वर्षांचा होतो. साठ-बासष्टपर्यंतचे त्याचे बहुसंख्य चित्रपट मी नंतर ‘मॅटिनी’ला जाऊन आवर्जून पाहिले. अपवाद ‘यहुदी’, ‘नया दौर’ व ‘मधुमती’ हे मात्र मी ताजे ताजे पाहिले. त्यांच्यामुळेच तर मागला सगळा ‘बॅकलॉग’ भरून काढायच्या ऊर्मीने मी पेटून उठलो. पेपरात जाहिरात बघायची व धावत सुटायचं. ‘शहीद’ मी ‘रेडियो’ टॉकजला, ‘तराना’ ग्रँट रोडच्या ‘न्यू आफ्रेड’ या खुराडय़ात, ‘अनेखा प्यार’ हा तिथेच समोर ‘सुपर’ला, ‘मीलन’ हा ‘स्वस्तिक’ला. ‘हलचल’ हा वरळीच्या ‘लोटस’ला, ‘बाबुल’ हा भायखळय़ाच्या ‘पॅलेस’ला, ‘अंदाज’ हा ‘लिबर्टी’ला, ‘उडन खटोला’ हा ‘ब्रॉडवे’ला, ‘दाग’ हा गिरगावातील ‘मॅजेस्टिक’ला, ‘देवदास’ हा ‘नाज’ला…

पुढे कधीतरी ‘नाज’ला ‘देवदास’ लागलेला असताना माझे एक नातेवाईक मला म्हणाले, ‘‘जाणार की नाही?’’
‘‘जाणार नाही. मी तिथेच असणार.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला यायचं तर या.’’
‘प्रेस शो’ला ‘मजदूर’ बघताना मी कोणाला तरी म्हणालो, ‘‘ही ‘नया दौर’ची शहरी आवृत्ती आहे.’’
‘‘नॉनसेन्स…’’ चोप्राचा पब्लिसिस्ट बनी रुबेन गरजला, ‘‘दोन चित्रपटात काहीच साम्य नाही.’’
‘‘अच्छा?’’ मी आव्हान स्वीकारत म्हणालो, ‘‘किती वेळा पाहिलाय ‘नया दौर’?’’
‘‘दोनदा.’’ तो जोरात म्हणाला.

‘‘मी एकोणतीस वेळा पाहिलाय.’’ मी थंडपणे म्हणालो, ‘‘‘नया दौर’मध्ये अजित जीवनला म्हणतो, ‘तुम फायदा देखो, मै नुकसान देखता हूँ!’ हाच संवाद ‘मजदूर’मध्ये राज बब्बर सुरेश ओबेरॉयला म्हणतो. बाकी सगळी साम्यस्थळे सांगू? एक गोष्ट लक्षात ठेव. तू चोप्राचा पगारी पब्लिसिस्ट आहेस. मी दिलीप कुमारचा फॅन आहे. नेव्हर चॅलेंज अ फॅन.’’

दिलीप कुमार हा शब्द वळणदार अक्षरात गिरवून अभिनयदेवता सुखासमाधानाने निवृत्त झाली असं मानणाऱया पिढीचा मी एक सैनिक आहे. दिलीप कुमारचा सच्चा वारसदार व त्याची अभिनयपताका खांद्यावर घेऊन पुढे निघालेला अमिताभ बच्चन अलीकडेच म्हणाला, ‘‘वयाने ते माझ्यापेक्षा वीस वर्षे मोठे आहेत. पण अभिनयात दोन हजार वर्षे पुढे आहेत.’’ यात अमिताभचा विनय दिसतोच, पण गुणग्राहकताही दिसते.

बलराज सहानी खूप वर्षांपूर्वी म्हणाला होता, ‘‘मला काहीच सुचेनासं होतं तेव्हा मी दिलीप कुमारसारखा अभिनय करून मोकळा होतो.’’

त्याची संवादफेक व हातवारे यांचा पुढल्या पिढीतील नटांवर विलक्षण पगडा आढळतो. अमिताभदेखील त्यातून सुटलेला नाही. ‘कोहिनूर’मधला दिलीप कुमारने जीवनसह रंगवलेला आरशातील प्रसंग अमिताभने तसाच्या तसा ‘मर्द’मध्ये प्रेम चोप्राबरोबर केला. राजेश खन्नाने ‘बंधन’मध्ये ‘नया दौर’मधला ‘काwनसी रजनी माँ? वो दुर्गा मावसीवाली?’ हा प्रसंग कानामात्रा न बदलता केला. राजेंद्रकुमारने ‘गंगा जमना’तील प्रसंग ‘गँवार’मध्ये खास स्वतःसाठी लिहून घेतला. मनोजकुमारने दिलीपकुमारची विकृत प्रतिमा सादर केली. (‘शबनम’मध्ये दिलीप कुमारचे नाव मनोज होते. केवळ एवढय़ासाठी मनोजकुमारने पडद्यासाठी ते नाव धारण केले.) ‘विवाह’मध्ये शाहीद कपूरने तरुण दिलीप कुमार दाखवला. ‘शूल’मध्ये मनोज वाजपेयीने एक प्रसंग इतका दिलीप कुमारसारखा वठवला की बघताना वाटलं आपण जणू दिलीप कुमारच बघतोय. दिलीप कुमार माहीत नसलेल्या नवीन पिढीला शाहरुख खानने समग्र दिलीप कुमार दाखवला आणि तो पडद्यावरचा ‘बादशहा’ झाला.

या सगळय़ा गदारोळात ‘ओरिजिनल’ दिलीप कुमार झपाटय़ाने विस्मृतीत जात राहिला. पहिला महान नट व ‘सुपरस्टार’ म्हणून सर्रास लोक अमिताभ बच्चनचं नाव घेऊ लागले. यशस्वी होण्यासाठी अनेक नट त्याच्या पाऊलखुणा शोधत चालले व यशस्वी झाले. उत्तम अभिनय करणे म्हणजे दिलीप कुमारसारखा अभिनय करणे असे मानले जाऊ लागले होते. त्याच्या समकालीन नटांत अभिनयाच्या बाबतीत तो कित्येक योजने पुढे होता. सामान्य चित्रपट त्याच्या उपस्थितीमुळे दर्जेदार वाटू लागत. तो पडद्यावर असला की त्याच्यावरून नजर हलत नसे. चित्रपटाला चित्रपट बघण्यासाठी नव्हे तर त्याला बघण्यासाठी चित्रपटाला जाणं व्हायचं. ‘धरम अधिकारी’ या अतिसामान्य चित्रपटात दिलीप कुमार सोडून काय होतं?

दिलीप कुमार त्याच्या व आमच्या हयातीत विसरला गेला हे शल्य उरी घेऊन आम्हाला आता पुढील खडतर वाटचाल करायची आहे.