
>> दिलीप ठाकूर
अष्टपैलू अभिनेता रवींद्र बेर्डे यांचे मुंबईत दोन दिवसांपूर्वी निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डेंचे ते मोठे भाऊ. दोघांत पाच वर्षांचे अंतर. योगायोग असा की, 16 डिसेंबर हा लक्ष्याचा एकोणिसावा स्मृतिदिन. लक्ष्याच्या सुपरस्टार वलयातही रवींद्र बेर्डे कुठेच हरवले नाहीत. आपली ओळख निर्माण केली. त्यांनी आपली अभिनय शैली व क्षमतेनुसार यशस्वी वाटचाल केलीच. तसेच ते सतत मोठा भाऊ या नात्याने लक्ष्याच्या सोबत राहिले. लक्ष्याच्या दुर्दैवी निधनानंतर प्रिया बेर्डे आणि तेव्हा तिची लहान असलेली अभिनय व स्वानंदी ही मुले यांना साथ दिली.
रवींद्र बेर्डे म्हणताच काही भूमिका आठवायला हव्यातच. ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकात ते लक्ष्याला उद्देशून म्हणतात, ‘‘ए… गणपती’’ आणि नाटय़ रसिकांत एकच हशा उसळे. महेश कोठारे दिग्दर्शित व अभिनित ‘झपाटलेला’ या चित्रपटात विजय चव्हाण व रवींद्र बेर्डे यांची सख्या-तुक्या (सखाराम हवालदार व तुकाराम हवालदार) अशी हवालदारांची धमाल जोडी आणि विजय चव्हाणचा रवींद्र बेर्डेच्या मुलीवर (पूजा पवार) डोळा. त्यातून निर्माण होत गेलेले विनोद भरपूर हशा वसूल करणारे. महेश कोठारेच्याच ‘माझा छकुला’मध्ये लक्ष्या, रवींद्र बेर्डे, पूजा पवार व विजय चव्हाण हे डोंबारी. अशा अनेक लहानमोठय़ा भूमिका साकारत रवींद्र बेर्डेंची यशस्वी वाटचाल झाली. 1995 साली दिग्दर्शक सी. व्ही. मलायील यांच्या मल्याळम भाषेतील चित्रपटाचा मराठीत ‘माझा मुलगा’ या नावाने डब चित्रपट प्रदर्शित झाला. त्यासाठीही रवींद्र बेर्डेंनी डबिंग करून आपले अष्टपैलुत्व दाखवले. मिस्कील हसणं आणि एखाद्याला मनापासून दाद देणे ही या गप्पिष्ट कलाकाराची खासीयत. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धातील मराठीतील विनोदी चित्रपटांच्या लाटेत त्यांनी कामाचा भरभरून आनंद घेतला आणि 2012 पर्यंत चित्रपटात भूमिका साकारत होते. ‘भुताची शाळा’ हा 2012चा चित्रपट.
गिरगावातील कुंभारवाडय़ात लहानाचा मोठा होताना आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव रवींद्र बेर्डेंवरही पडणे स्वाभाविक होतेच. कारण मुळात स्वभाव मनस्वी. वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांनी मुंबई आकाशवाणीवर नोकरीत रस घेतला. तेथे चोवीस वर्षे नोकरी करत असतानाच रंगभूमी व चित्रपटांतून भूमिका साकारण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी सांभाळून हळूहळू एकेका चित्रपट व नाटकांमधून काम सुरू झाले आणि मग कला क्षेत्रात मन रमवले. विशेषतः खूपच मोठय़ा प्रमाणावर मराठी चित्रपटांतून भूमिका साकारल्या. ‘चंगू मंगू’, ‘गंमत जंमत’, ‘सुना येती घरा’, ‘कमाल माझ्या बायकोची’, ‘बजरंगाची कमाल’, ‘चिकट नवरा’, ‘धमाल बाबल्या गणप्याची’, ‘हाच सूनबाईचा भाऊ’, ‘हमाल दे धमाल’, ‘होऊन जाऊ दे’, ‘गरम मसाला’, ‘भरला हा मळवट रक्तानं’, ‘तू सुखकर्ता’, ‘ठणठण गोपाळ’, ‘धरलं तर चावतंय’, ‘अपराधी’, ‘टाटा बिर्ला आणि लैला’, ‘शेम टू शेम’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘शासन’, ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘धडाकेबाज’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘उचला रे उचला’, ‘आया सावंत झुम के’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. अनेक चित्रपट लक्ष्मीकांत बेर्डेसोबतचे आहेत. हिंदीतही रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’मध्ये जमीनदार चंद्रकांत साकारला. ‘नायक- द रिअल हीरो’, ‘हम दो अंजाने’ अशा काही हिंदी चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीवरही मोठी वाटचाल केली. या दोन्ही माध्यमांतील फरक त्यांनी उत्तम रीतीने आत्मसात केला होता. या प्रवासात त्यांच्या भेटीचे लहानमोठे अनेक योग आले. त्या भेटीत आमच्या नाटक व चित्रपटावर गप्पा होत. या वाटचालीत पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित अतिशय वेगळ्या अशा ‘भस्म’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली. अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या रवींद्र बेर्डे यांचे नाटक पाहण्याचे वेड त्यातही कायम होते. ‘संगीत देवबाभळी’ त्यांनी चारवेळा पाहिले. कलाकार म्हणून वावरताना कुटुंबवत्सल हेही त्यांचे वैशिष्टय़.
आपल्या कामाचा स्वतः आनंद घेताना तो इतरांनाही देणे हे रवींद्र बेर्डेंचे वैशिष्टय़ कायमच लक्षात राहील.



























































