एक संस्मरणीय भेट…

>> दिलीप ठाकूर

माझ्या बोरिवलीतील राजेंद्र नगरमधील घरी विक्रम गोखले आले होते तेव्हाची आठवण. 2019 मधील तो शुभ दिवस होता. आदल्या दिवशी त्यांचा फोन आला, पुणे विद्यापीठात मी मास मीडिया आणि कम्युनिकेशन या विषयावर लेक्चर देतोय, त्यासंदर्भात तू अधिक तपशील देऊ शकतो. तुझे मी उपग्रह वाहिन्यांवरील चर्चेतील सहभाग आणि खास करून एबीपी माझा वाहिनीवरील ’फ्लॅशबॅक’ पाहतोय. तू असलेले अनेक भाग मी पाहिलेत.

विक्रम गोखले यांचे असे म्हणणे माझ्यासाठी मोठे सरप्राईज होते. जवळपास चाळीस वर्षे मी मीडियात आहे आणि अगणित चित्रपट पाहिले, फिल्ड वर्क केले, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक स्तरांवर माझ्या  ओळखी आहेत. असे असतानाच विक्रम गोखलेंना माझी काही वैशिष्टय़े लक्षात यावीत हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. स्वप्नवत गोष्ट होती. आपण विलेपार्ले विभागात कुठे तरी भेटू असे मी त्यांना नम्रपणे म्हटले. पण ‘माझे काम आहे’ मी तुझ्याकडे येतो असे म्हणतच त्यांनी माझ्या घरी येण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते वेळेवर आले. ‘चित्रपट आणि बदलता समाज’ यावर आमच्या दीड तास गप्पा झाल्या. ओघात इतरही अनेक विषय आलेच. जुना सिनेमा आणि चित्रपटाचे यशापयश वगैरे. विशेष म्हणजे, एबीपी माझा वाहिनीवरील फ्लॅशबॅक अनेकदा पाहताना त्यांच्या लक्षात आले की, त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी, संदर्भ, एखादा दृष्टिकोन मी देऊ शकतो. आपण जे चांगले काम करतो त्याची अशी कुठेना कुठे सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असतेच आणि हीच गोष्ट आपल्या कामातील हुरुप वाढवते.

विक्रम गोखले यांच्याशी मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या मुहूर्ताला अथवा सेटवर अनेकदा भेटी झाल्या. या सगळय़ात त्यांच्याशी झालेली पहिली भेट विशेष आहे.

‘रसरंग’च्या 1990 च्या दिवाळी अंकासाठी विक्रम गोखले यांची मुलाखत मी करायची आहे असे माझे ज्येष्ठ सहकारी वसंत भालेकर आणि विजय जानोरकर यांनी मला सुचवले. यात आपली कसोटी आहे याची मला कल्पना आली. मला मराठी आणि हिंदी चित्रपटातील विक्रम गोखले माहीत होते, पण रंगभूमीवरील त्यांच्या प्रवास आणि प्रभाव यांची कल्पना नव्हती. तोपर्यंत मी एखादे अवघड काम कसे टाळायचे आणि सोपे काम आपल्याकडे घ्यायचे यात मुरलो नव्हतो. त्या काळात एखाद्या कलाकाराच्या भेटीसंदर्भात सकाळी लवकर फोन करावा लागे. याचे कारण म्हणजे तो कलाकार एकदा का घराबाहेर पडला की तो आज कुठे शूटिंग करतोय आणि महत्त्वाचे म्हणजे, तेथे भेटायला येऊ का? मुलाखत होईल का की एक दोन दिवसांत घरीच येऊ अशा थेट गप्पा होत.

विक्रम गोखले यांच्या विलेपार्ले येथील घरी फोन केला आणि त्यांनी चिरेबंदी बंगल्यात स्मिता तळवलकरच्या ‘द्विधाता’ या मालिकेचे शूटिंग करतोय तेथे ये असे म्हटले. दिवाळी अंकासाठीची मुलाखत म्हणजे बरीच मोठी आहे याची त्यांना कल्पना आली आणि मग एकूण तीन भेटींत ती मुलाखत झाली आणि त्यांनी म्हटले, लिहून झाल्यावर वाचायला आण. कारण आपण तुकडय़ा तुकडय़ाने भेटल्याने उगाच काही मुद्दय़ांची सरमिसळ झाली असेल कदाचित… त्यांचे म्हणणे अगदी बरोबर होते. मलाही तीनदा रफ लेखन केल्यावर फायनल ड्राफ्ट जमला. तो त्यांना ‘बरा वाटला’ त्यांच्याही लक्षात आले होते की, प्रश्नोत्तराची वीण म्हणावी तशी नाही, पण दिवाळी जवळ येत चालली होती. असो. रसरंग वाचणारा वर्ग खूप मोठा होता, त्यामुळे ही मुलाखत वाचली असे सांगणारे खूप भेटले, पण तीच मुलाखत आवडली असेही काहीनी सांगितले. त्याचे श्रेय अर्थात विक्रम गोखले यांना! अतिशय मुद्देसुद आणि खोलवर असे त्यांचे म्हणणे आणि ठाम सडेतोड  मते हे त्यांचे वैशिष्टय़ त्यात आले होते.

आपल्या चतुरस्र अभिनय वाटचालीच्या दीर्घकालीन अनुभवातून विक्रम गोखले यांनी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले ‘आघात’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले तेव्हा त्यांच्याशी मुद्देसूद गप्पा झाल्या. आपल्या विषय निवडीपासून ते आपल्या मांडणीपर्यंत त्यांचा फोकस अगदी स्पष्ट होता. अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन भिन्न भूमिका आहेत याचे भान त्यांनी राखल्याचे कौतुक वाटलं.

आणि आता ते चक्क माझ्या घरी आले होते

एखादा कलाकार माझ्या घरी येण्याचा योग असा आला. विक्रम गोखले यांचे माझ्या घरी येण्याचा संदर्भ खूप महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच या सगळय़ा जुन्या आठवणी डोळय़ासमोर आल्या.