केंद्र सरकारने नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर कडक कारवाई करावी – वळसे पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. शुक्रवारच्या नमाजनंतर त्यांचा निषेध करण्याचं मुसलमान संघटनांनी ठरवलं होतं. त्यानुसार आज देशभरात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात देखील संभाजीनगर, जालना, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये एमआयएमच्या नेतृत्वाखाली आंदोलनं करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील य़ांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

”कालच महाराष्ट्र पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्व जिल्ह्यातील युनिट्सला सावध करण्यात आलं होतं. तशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याचा आढावा घेतला. महाराष्ट्रात सोलापूर, संभाजीगनर, जालन्यासोबत इतर काही भागात मुस्लीम समाजाने शांततेच्या मार्गातून हे आंदोलन केलं. आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

”ज्या नुपूर शर्मा व नवीन जिंदालने वादग्रस्त उद्गार काढले. त्यांच्याविरोधात महाराष्ट्रातील विविध भागात केसेस दाखल केलेले आहेत. पण केंद्र सरकाराने देखील या दोघांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे” असे देखील दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

यावेळी वळसे पाटील यांनी सर्व धर्मियांना राज्यात शांतता व कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे आवाहन केले आहे. ”माझं सर्व समाजांना आवाहन आहे. जसं आपण आपल्या श्रद्धास्थानांचा आदर करतो तसंच दुऱ्यांच्या श्रद्धास्थानांचा देखील करावा. आपल्याकडे इतरही बरीच कामं आहेत. राज्यात परिस्थिती शांत ठेवण्याच्या व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून काम करावे”, असे आवाहन त्यांनी केले आहे.