दिंडोशीत युवासेनेची ऑक्सिजन बँक, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून दिंडोशीत युवासेनेमार्फत ‘ऑक्सिजन बँक’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या संकल्पनेत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले जाणार आहे. युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आल्याची माहिती युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनील प्रभू यांनी दिली. दिंडोशी येथील एकूण आठ प्रभागांत ही योजना राबविण्यात येणार असून यासाठी एकूण 21 जणांची टीम कार्यरत असणार आहे.

कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा शुभारंभ नुकताच शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. या ऑक्सिजन बँकेच्या संकल्पनेबद्दल अधिक माहिती देताना अंकित प्रभू म्हणाले की, कोविड रुग्ण घरी असताना त्याची ऑक्सिजन पातळी ही कमी-जास्त होत असते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी दिंडोशी युवा सेनेच्या माध्यमातून दिंडोशी विधानसभेतील प्रत्येक प्रभागात आम्ही ’ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहे. डॉक्टर आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली गरजू कोविड रुग्णांनी येथील युवा सेनेच्या टीमशी संपर्क साधल्यावर त्यांना त्वरित घरपोच  ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन’ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

तर हे मशीन कसे ऑपरेट करायचे याचे प्रात्यक्षिक दिले जाईल. कोविड रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळाल्यावर त्यांच्या घरून त्वरित घरपोच  ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन’ घेऊन येतील. कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन मिळाल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करेपर्यंत त्यांची खाली येणारी ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.