जेएनपीटीच्या कामगार वसाहतीत दूषित पाणीपुरवठा

441

जेएनपीटी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथे राहणाऱ्यांना नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका आहे. जेएनपीटी वसाहतीत पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच आता दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

जेएनपीटी वसाहतीला पाणी टंचाईने ग्रासले आहे. कधी कधी टँकरद्वारे येथे पाणी पुरवठा केला जातो. या वसाहतीला दररोज 5 एमएलडी पाण्याची गरज असताना रोज फक्त 1 ते 1.5 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. वसाहतीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, आता सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो अपुरा असल्याने येथील नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. काही नागरीक शेजारील गावातून किंवा बाटलीबंद पाणी विकत घेत आहेत.

सिडकोने काही दिवसांपूर्वी पाईपलाईन दुरूस्तीचे काम करण्यासाठी पाणी बंद केले होते. त्यानंतर 22 जानेवारीपासून वसाहतीत दुषित पाणी पुरवठा होत आहे. सिडकोला याबाबत आम्ही लेखी पत्राद्वारे कळविले आहे. तसेच पाण्याच्या नमुना पाठविला आहे. त्यांच्याकडून तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे, असे जेएनपीटी पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक जयंत देशमुख यांनी सांगितले. शनिवारी आम्ही जेएनपीटी टाऊनशिप येथे जाऊन पाईपलाईनची व पाण्याची पहाणी केली. आता तिथे शुद्ध व चांगले पाणी येत आहे. सिडकोकडून शुद्ध व चांगल्या पाण्याचा पुरवठा होत आहे, असे हेटवणे पाणीपुरवठा विभागाचे अंभियते चिमाजी दलाल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या