फडणवीसांसोबत हवापाण्याच्या गप्पा – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-in-speech

देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरू झाले, असे समजण्याचे कारण नाही. आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्या, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यानंतर माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात पहिल्यांदाच एकत्र आले. यावेळी दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.

सोमवारी बारामती येथे आलेल्या अजित पवार यांना या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी लग्न समारंभात खुर्च्याच अशा मांडल्या की माझी आणि फडणवीस यांची खुर्ची शेजारी शेजारी आली. शेजारी बसलो म्हणजे लगेच काही सुरू झाले, असे समजण्याचे कारण नाही. शेजारी बसून आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारतो, असे पवार म्हणाले.

राजकीय व्यक्ती एकमेकांचे दुश्मन नसतात

राजकीय व्यक्ती कधी कायमच एकमेकांचे दुश्मन नसतात. सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करतात. एकत्र बसतात, चर्चा होते. यात दुसरे काहीही नव्हते. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला आणि इतरांना बोलावले होते, म्हणून त्या लग्नाला आम्ही गेलो होतो, असे अजित पवार म्हणाले.

फडणवीसांच्या मुलाखतीकर बोलण्यास नकार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्की एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांबाबत अनेक दावे केले. याबाबत विचारले असता, त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. फडणवीस यांच्या मुलाखतीवर काहीही बोलणार नाही, मला बारामतीची प्रचंड कामे आहेत,  ती कामे करणे हेच माझे एकमेव काम आहे. तेच मी करत राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.