‘दिशा’ कायद्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन, गृहमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anil-deshmukh-new

महिलांवरील अत्याचारांना चाप लावण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’ कायदा आणण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदनाद्वारे केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात येईल असेही गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासंदर्भातला हा कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच स्थगित करावे लागत असल्यामुळे या कायद्याचे विधेयक या अधिवेशनात मांडणे शक्य नाही असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हा कायदा करताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विचारमंथन होणे गरजेचे आहे. विधी व न्याय, महिला व बालकल्याण, वित्त या विभागांचे अभिप्राय आवश्यक आहेत. दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

त्यापूर्वी बैठक घेऊन महिलांसाठी काम करणाऱया सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या जातील, असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. याबाबतची सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी केली.