
मंत्रीपदाचा गैरवापर करून एका दिवसात पदवी प्रमाणपत्र मिळविणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी तसेच मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्यावतीने राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील महत्त्वाच्या अधिकारी पदावर प्रभारी अधिकाऱयांचीच नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा, निकालप्रक्रियेत अनागोंदी सुरू असून विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
12 एप्रिलला कला शाखेची सत्र सहाची परीक्षा सुरू झाली, मात्र विद्यार्थ्यांना 11 एप्रिलला सायंकाळी हॉल तिकीट देण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची अभ्यासाची वेळ वाया गेली. एमबीए सीईटी परीक्षेतही परीक्षा पेंद्रावरून गोंधळ झाला. काही ठिकाणी 150 तर काही ठिकाणी 180 मिनिटांची परीक्षा घेण्यात आली. यामुळे ही परीक्षा पुन्हा 30 एप्रिलला होणार आहे. अशा सर्व प्रश्नांकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचे युवासेनेने राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
चंद्रकांत पाटील यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून 1980 साली पदवी उत्तीर्ण झाले. पदवी प्रमाणपत्र गहाळ झाल्याने त्यांनी डुप्लिकेट प्रमाणपत्रासाठी आवश्यक ती कार्यवाही न करता फक्त एका दिवसात त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. अनेक विद्यार्थी एक महिन्यापूर्वी अर्ज करूनही त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांना एक न्याय आणि मंत्र्यांना वेगळा न्याय असे का, असा सवाल माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण खाते सांभाळण्यास अपयशी ठरलेल्या चंद्रकांत पाटील यांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
राज्यपालांकडून दखल
युवासेनेच्या पत्राची राजभवन सचिवालयाकडून दखल घेण्यात आली असून याप्रकरणी योग्य कारवाई करण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आल्या असून तसेच पत्रच कुलगुरूंना पाठविण्यात आले आहे.



























































