
अभिनेता आमिर खान याचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट माहीत असेल. त्यातील इशान नावाचा लहान मुलगा आठवत असेल. इशानला डिस्लेक्सिया ही समस्या होती. त्यामुळे लिहायला, वाचायला, व्याकरण समजून घ्यायला येणारी अडचण येते. त्याची अभ्यासात गती नसते. मात्र रंगरेषांच्या दुनियेत त्याचे मन रमते. त्यामुळे तो सुंदर चित्रं काढत असतो. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाची इथे आठवण आली, ती जळगावचा युवा चित्रकार शिवम हुजूरबाजार याच्यामुळे. शिवमनेही कलेच्या क्षेत्रात अशीच भरारी घेतली आहे. रंगरेषांच्या दुनियेत त्याने स्वतःची छाप उमटवली आहे.
शिवमने आपल्यातील समस्येवर मात करून आयुष्याच्या कॅनव्हासवर रंगाची दुनिया साकारली. त्याला फक्त 20 टक्के ऐकू येते. त्याच्यातील संवदेनशील चित्रकाराने त्यावर मात करून त्याला असामान्य बनवले. रंगरेषांची दुनिया त्याला आवडली. त्यामध्ये शिवम हरखून गेला, हरपून गेला. आईवडिलांकडून मिळणाऱया मार्गदर्शनाच्या पाठींब्यावर शिवमने कलाक्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.
शिवमने ऍबस्ट्रक्ट आणि मॉर्डन आर्ट पेंटींगमध्ये विविधता साकारली आहे. ती त्याची खासियत आहे. तो न्यूरोसर्जन डॉ. संजीव हुजूरबाजार आणि डॉ. आरती हुजूरबाजार यांचा मुलगा आहे. घरचे वातावरण वैद्यकीय असले तरी शिवमचा कल बालपणापासून चित्रकलेकडे राहिला. अगदी ‘तारे जमीन पर’ च्या इशानसारखाच. वयाच्या आठव्या वर्षांपासून तो चित्रं काढतोय. सुरुवातीला त्याने पेंट या सॉफ्टवेअरमध्ये शेकडो चित्रे काढली. शिवमचे पहिले प्रदर्शन 2013 साली जळगाव येथे भरले. तेव्हापासून त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. त्याने चित्रकलेत जी. डी. आर्टची पदवी मिळवली. जळगाव, मुंबई, पुणे येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन झाले. या प्रदर्शनाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पेंटींग व्यतिरिक्त शिवमला फोटोग्राफीची आवड आहे. त्याला निसर्ग आणि फूड फोटोग्राफी करायला आवडते.
वरळीत ‘‘बियॉण्ड थॉट्स’ प्रदर्शन
शिवमने आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊन साकारलेल्या अमूर्त चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत 5 ते 11 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत बघता येईल. ‘बियॉण्ड थॉट्स’ असे प्रदर्शनाचे नाव आहे. प्रदर्शनातील चित्रे शिवमच्या संवेदनशील मनातील भावभावना व्यक्त करतात. त्याच्यासाठी चित्र हाच विचार, चित्र हीच भाषा आणि चित्र हाच संवाद झालाय. अमूर्त चित्रांतून त्याला काहीतरी सांगायचं असतं. त्याची संवादप्रक्रिया सुरू असते. बघणाऱयाला ही चित्रे अंतर्मुख करतात. त्याची चित्रभाषा जास्त संवाद साधणारी आहे.
























































