दिव्यांग असून करायचा चोऱ्या, चोरी करताना रंगेहाथ पकडले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या वेळेस प्लॅटफॉर्म आणि बुकिंग हॉलमध्ये झोपणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्याला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. उस्मान युसूफ शेख असे त्याचे नाव आहे. 15 वर्षांपूर्वी लोकल अपघातात त्याचा एक हात आणि एक पाय त्याने गमावला होता. चोरीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

रेल्वे फलाट आणि बुकिंग हॉलमध्ये रात्रीच्या वेळेस झोपणाऱया प्रवाशांचे मोबाईल चोरीच्या घटनांची दखल अंधेरी रेल्वे पोलिसांनी घेतली. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तेथे गस्त करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय नाईक हे गस्त करत होते. गस्तीदरम्यान उस्मान हा फलाट क्रमांक 3 वर झोपलेल्या एका प्रवाशाचा मोबाईल चोरत होता. हा प्रकार नाईक यांच्या लक्षात आला. त्याने उस्मानला मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडले.  उस्मान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. 15 वर्षांपूर्वी तो मुंबईत आला होता.