स्वागत दिवाळी अंकांचे

संवाद

विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित या विशेषांकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधी आणि विज्ञान-तंत्रज्ञान  यावर विवेचन करणारे दोन लेख आहेत. यांसह काही विज्ञान साहित्यांबरोबरच डॉ. अनिल काकोडकर यांचे ‘संशोधन व विकास आणि भारत’ या विषयावरील भाषण, जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची मुलाखत, डॉ. अरविंद नातू यांच्याशी ‘आयसर’ संस्थेविषयी साधलेला संवाद, दीपक शिकारपूर यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ यावरील विवेचन, डॉ. विनिता आपटे यांनी घेतलेला ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा आढावा. याशिवाय विज्ञान कथाही वाचायला मिळणार आहेत.

संपादक : रेशमा जीवराज चोले

मूल्य : 100 रु., पृष्ठे : 108

प्रजावाणी

या दिवाळी अंकात ‘स्वतंत्र भारत घडविणारे पाच करार’ (लक्ष्मण संगेवार), हैदराबाद मुक्तिसंग्राम (मुरलीधर पाठक), फळलेलं परराष्ट्र धोरण (अरविंद गोखले), तारणहार न्याययंत्रणा (वर्षा देशपांडे), म्हणून होतो न्यायदानाला विलंब (स्मिता सिंगलकर) हे अभ्यासपूर्ण लेख आहेत. संवादाच्या संकल्पनेची उकल करणारे संदीप खरे, चंद्रशेखर गोखले, स्पृहा जोशी, शर्वरी जेमेनीस आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे लेख वाचनीय. आंदोलनांनी काय मिळाले, याबद्दल नीलम गोऱहे, संजय सोनावणी, अन्वर राजन आदी मान्यवरांनी महत्त्वाची भूमिका मांडणारे लेखन केले आहे. बँकिंगविषयी अनंत सरदेशमुख, दिलीप सातभाई, पी. एन. जोशी यांनी विविध पैलूंचा परामर्ष घेतला आहे.

संपादक : शंतनु डोईफोडे

मूल्य : 100 रु., पृष्ठे : 228

संचार

गदिमा, पु.ल. देशपांडे, सुधीर फडके या दिग्गजांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एक विशेष लेखमाला या अंकात असून यासाठी डॉ. यशवंत पाठक, श्रीधर फडके, अतुल परचुरे यांनी लिखाण केले आहे. सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या व्यक्तींची समाजासमोर एक प्रतिमा असते. पण या प्रतिमांमागे एक ‘मी’ असतो. हा ‘मी’ शोधण्याचा प्रयत्न परिसंवादातून केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऍड. उज्ज्वल निकम, प्रसन्न जोशी, संदीप खरे यांनी आपल्या कार्याचा आढावा, कौटुंबिक जडणघडण, मते अशा पैलूंवर भाष्य केले आहे. एक चांगली कविता तयार होण्यासाठी बराच मोठा प्रवास घडत असतो. हा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न ‘कवितेच्या आठवणी’ या परिसंवादातून केला आहे.

संपादक : धर्मराज काडादी

मूल्य : 100 रु., पृष्ठे : 268

माय मृण्मयी

कथा, कादंबरी, लेख, व्यक्तिविशेष, ललित, समीक्षा, दीर्घ कविता असा साहित्यिक फराळ घेऊन माय मृण्मयीचा अंक प्रसिद्ध झाला आहे. अंकात उमर कैद ही संपूर्ण कादंबरी चिन्मय राजाध्यक्ष यांच्या लेखणीतून साकारली आहे. त्यानंतर डॉ. सुमित्रा पाटकर, अतुल कुलकर्णी, नमिता कोठावळे, विजय जोशी यांच्या कथा, दीर्घ कथांनी हा अंक सजला आहे. हिंदुस्थानचे विराटनंतर नवोदीत रनमशीन म्हणून ओळखला जाणारा मुंबईकर पृथी शॉ यांच्यावर क्रीडा समिक्षक नवनाथ दांडेकर यांनी लिहिलेला लेख, तसेच डॉ. गजानन दिवेकर यांनी दिलेल्या आयुर्वेदीक टीप्स, महिलांसाठी आगळं आणि वेगळं कलादालन, तसेच सोप्या पाककृती कविता लाखे आणि संजीवनी धुरी यांनी दिल्या आहेत.

संपादक : बबन स. गांवकर

मूल्य : 100 रु., पृष्ठ : 136

महाअनुभव

युनिक फिचर्सचा महाअनुभव हा दिवाळी अंक मुखपृष्ठापासूनच आपले वेगळेपण सिद्ध करतो. दिवाळी अंकांच्या साचेबद्ध लिखाणच्या परंपरेत रिपोर्ताज पद्धतीचं लेखन रुजवण्याचा पायंडा पाडणारा दिवाळी अंक ही महाअनुभवची खरी ओळख. या रिपोर्ताज या भागातील अनुराधा मोहनी आणि रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा कोलकात्यातील सांडपाण्याचे व्यवस्थापन प्रणाली मांडणारा लेख, दीप्ती राऊत यांचा भामरागड तालुक्यातील लोकशाही रुजवणारा प्रयोग सांगणारा लेख वाचण्याजोगे आहेत.   रत्नाकर मतकरी व रंगनाथ पठारे यांच्या कथांनी कथेचा भाग सजला आहे. नितीन दादरावाला यांनी विवियन मेयरच्या शोधात या वेगळी शोधकथा आपल्यासमोर मांडली आहे तर चंद्रकांत पाटील यांनी लेखक श्याम मनोहर यांचंसार्थ शब्दचित्र उभं केलं आहे. याच भागतील गौरी कानेटकर यांचा अंधारगर्भात हा सुपरकेव्हजबाबत उत्कंठा वाढवणारा लेख अप्रतिम आहे.

संपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी

मूल्य : 150 रु., पृष्ठे : 185

आपली प्रतिक्रिया द्या