एसटी कामगारांना पाच हजार रुपयांची ‘दिवाळी भेट’ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक परिवहन संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा बोनस देण्यात आला होता. यंदा सरसकट सर्वांना पाच हजार बोनस जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळाचे राज्यभरात सुमारे 89 हजार कर्मचारी असून त्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी ‘दिवाळी भेट’ देण्यासाठी 45 कोटी रुपयांच्या निधीला राज्याच्या वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. एकीकडे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 22,500 रुपयांचा बोनस दिला असताना कोरोना काळात बेस्टच्या खांद्यास खांदा लावून सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे युनियनने म्हटले आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेला होत असतो. यंदा ऑक्टोबरचा पगार 21 तारखेला देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार संघटना यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र लिहून केली आहे.