दिवाळी शॉपिंगवर पाऊस, महागाईचे सावट; दुकानांपेक्षा रस्त्यांवर गर्दी

379

दिवाळी सण दोन दिवसांवर आलाय. शुक्रवारी, धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात हेतेय. दिवाळीनिमित्त मार्केट सजले असले तरी गेल्या आठवड्यापर्यंत ग्राहकांचा उत्साह फारसा दिसत नव्हता. वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि पाऊस यामुळे दिवाळीच्या शॉपिंगबाबत ग्राहक काहीसे निरुत्साही वाटत होते. मात्र आता या दोन्हींवर मात करीत ग्राहकांनी मार्केटमध्ये हळूहळू गर्दी करायला सुरुवात केली आहे. दुकाने आणि रस्त्यावरील खरेदीत पुन्हा ‘जान’ येताना दिसत आहे.

दादर, क्रॉफर्ड मार्केट, लिंक रोड, बोरिवली येथील मार्केटमध्ये कपडे, चप्पल, इमिटेशन ज्वेलरी, कंदील, दिव्यांची तोरणं, रांगोळ्यांचे छाप, रंग यांची खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत. पावसामुळे माल खराब होऊ नये म्हणून विक्रेत्यांनी ते मेणकापडाने झाकून ठेवले आहेत. रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी त्या तुलनेत दुकानांमध्ये अद्याप जास्त गर्दी दिसत नाही. अजून दोन दिवस आशा आहे ग्राहक येतील. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खरेदी करणारेही ग्राहक असतात, अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली.

पारंपरिक कंदिलांना मागणी

पारंपरिक पण वेगळा साज चढलेल्या आकाश कंदिलांना मागणी आहे. कागदाऐवजी शाईन, नक्षीदार जाळी पेपर आणि प्रिंटेड डिझाईनच्या पेपरने कंदील तयार करण्यात आले आहेत. काही आकाश कंदिलांना बांबूच्या चटईची किनार आहे. बांबू आणि कापड यांच्यापासूनही कंदील बनवले आहेत. शोभेच्या दिव्याप्रमाणे बांबूचे कंदील असून त्यांची किंमत 300 ते 700 रुपये एवढी आहे. पारदर्शी नक्षीकाम केलेले, कागदापासून बनवलेले पारंपरिक आकाश कंदीलही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.

-शॉपिंगवर सवलती

दिवाळीत ऑनलाइन शॉपिंग करणार्‍या ग्राहकांसाठी कंपन्यांनी   विविध ऑफर्स दिल्या आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्टवर याआधीच मोठे सेल पार पडले आहेत. याव्यतिरिक्त किमतीत घसघशीत सूट, क्रेडिट कार्डवर चांगले डिस्काऊंट, कॅश बॅक ऑफर अशा सवलतींचा वर्षाव होत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून ई-शॉपिंगला पसंती मिळत आहे.

फराळाला महागाईची फोडणी

घरी दिवाळी फराळ बनवायला वेळ मिळत नाही अशा गृहिणी रेडीमेड फराळावर भर देतात. या वर्षी तयार फराळाला महागाईची झळ बसली आहे. फराळाच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. डाळींचे वाढलेले दर, जीएसटी, महागडा गॅस, तेल – तुपाच्या किमती वाढणे यामुळे फराळाचे भाव वाढले आहेत. याचा परिणाम विक्रीवर झाला आहे.

 

पदार्थ       मागील वर्षीचे       यंदाचे 

              दर (रुपये)  दर  (रुपये)

भाजणी चकली 350         400

बेसन लाडू    15ते 20       30

तिखट शेव    200            250

शंकरपाळे     250            280 ते 300

चिवडा         300            320 ते 350

गावठी तुपाचे दर वाढले आहेत. गावठी तुपात तयार होणार्‍या सगळ्याच पदार्थांच्या किमती प्रतिकिलोमागे 40 ते 50 रुपयांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहकांच्या ऑर्डर तशा कमी आल्या आहेत. दोन किलोऐवजी लोकांनी एक किलो अशा प्रमाणात फराळाच्या ऑर्डर दिल्या आहेत. – रागिणी खामकर, साई बचतगट, नवी मुंबई

आपली प्रतिक्रिया द्या