
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मोठा बदल झाला आहे. पक्षाने आपला नवा मुख्यमंत्री निवडला असून आतापर्यंत उपमुख्यमंत्री असलेले डी. के. शिवकुमार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांचा शपथविधी ३ जून रोजी होणार आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून यापूर्वी सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री होते. मात्र पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेतील बदलाबाबत चर्चा सुरू होती. अखेर तो बदल आता निश्चित झाला आहे. सिद्धरामय्या यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आणि संपूर्ण मंत्रीमंडळ विसर्जित केले.
शनिवारी विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी राज्याच्या राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.
राज्यपालांचे डी. के. शिवकुमार यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण
कर्नाटकमधील सरकार स्थापनेची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी. के. शिवकुमार यांना कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी अधिकृतरीत्या आमंत्रित केले आहे. राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणानुसार, डी. के. शिवकुमार ३ जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.





























































