
तीर्थक्षेत्र आळंदीत श्रींच्या पालखी सोहळ्यास आलेल्या लाखो वारकरी भाविकांनी भगव्या पताका उंचावत आळंदीहून पंढरीकडे हरिनाम जयघोषात निघण्यास भल्या पहाटे मार्ग धरला. परंपरेने गांधी वाड्यातील दर्शनबारी आजोळघरी श्रींच्या पालखी सोहळ्याने आळंदीकरांचा एक दिवसाचा पाहुणचार घेत बुधवारी ( दि.२२) पुण्यनगरीकडे सोहळ्याने हरिनाम गजरात प्रवास सुरु केला. यावेळी आळंदी परिसरातील हजारो भाविक सोहळ्यास निरोप देण्यास उपस्थित होते. गांधी परिवाराने सोहळ्यात पहिल्या मुक्कामी श्रींच्या सोहळ्याचा पाहुणचार केला.
पुण्यात दोन दिवसांचे मुक्कामास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यनगरीत विसावणार आहे. श्रींच्या सोहळ्यास निरोप देण्यासाठी आळंदीकर थोरल्या पादुका मंदिरा पर्यंत आले होते. सुमारे बत्तीस दिवसांचा विरह सहन करावा लागणार असल्याने माउलींना निरोप देताना अनेकांचे नेत्रांच्या कडा पान्हावल्या.हृदय भरून आले होते. आळंदीत गेल्या चार दिवसांपासून लाखो वैष्णवांचा हरिनामाचा गजर चालू होता. पहाटे दोन चे सुमारास भाविकांना आजोळघरातील माउलींच्या पादुकांचे दर्शन बंद ठेवण्यात आले. आजोळघरी परंपरेने गांधी कुटुंबीयांच्या वतीने रुद्राभिषेक आणि पादुका पूजन करण्यात आले. त्यांच्या वतीने महानैवेद्य दाखविण्यात आला. देवस्थानच्या वतीने पहाटपूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वतीने माउलींना प्रथा परंपरेने नैवेद्य झाला. दरम्यान आळंदीकर माउलींची पालखी उचलण्यासाठी पहाटे सज्ज झाले. सहाच्या सुमारास श्रींची पालखी आजोळघरातून आळंदीकर ग्रामस्थांनी व खांदेकरी यांनी खांद्यावर घेत बाहेर आणली.
त्यानंतर माउली-माउली नामाच्या गजरात व “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या नामघोषात पालखी नगर पालिका चौकात आली. या ठिकाणी सुदीप गरुड परिवाराने पुष्प सजावटीने सजवलेल्या वैभवी चांदीचे पालखी रथात आळंदीकरांनी पालखी फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात ठेवली. आळंदी पालिकेच्या वतीने देवस्थान समिती, मालक, चोपदार, दिंडीकरी या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या वेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचेसह नायब तहसीलदार मदन जोगदंड, मुख्याधिकारी अंकुश जाधव, पदाधिकारी आदींनी श्रींच्या पालखी रथात श्रींचे दर्शन घेत सोहळ्याचे स्वागत करून श्रींच्या पालखी सोहळ्यास निरोप दिला.
आळंदीतील प्रदक्षिणा मार्ग, पालिका चौक, देहू फाटा, चोविसावाडी, वडमुखवाडी या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी तसेच निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील महिला, पुरुष, लहान मुले माउलींच्या रथासोबत हरीनाम गजरात चालत होते.
एक दिवसाच्या पहिल्या मुक्कामी सोहळ्या मध्ये हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. हरिनाम गजरात परंपरेने जागर,कीर्तन सेवा तसेच पाहत पूजा झाली. भल्या पहाटेच श्रींचे पालखी सोहळ्याचे आळंदीतील आजोळघरी एक दिवसाचा मुक्काम घेत सोहळा पुढील प्रवासास आळंदीकरांचा हरिनाम गजरात भक्तिमय निरोप घेत सोहळा पुण्यनगरीकडे बुधवारी मार्गस्थ झाला. आळंदी नगरपरिषद चौकात सोहळ्यास निरोप देण्यात आला. पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भाविक,ग्रामस्थ येथे जमले होते.

























































