
बँकेची चौकशी सुरू झाली… बँक बुडाली! अशी अफवा पसरली… अन् ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेच्या पैठण शाखेत ठेवीदारांनी प्रचंड गर्दी केली. पैसे काढून घेण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यात आली. रस्त्यावर अक्षरशः ट्राफीक जाम झाली. पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु दिवसभर हा गोंधळ चालू होता. ‘विड्रॉल भरून द्या’ आरटीजीएसद्वारे रकमा जमा होतील.’ असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. यानंतर 200 पेक्षा अधिक जणांनी तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त ठेवींचे विड्रॉल दाखल केले असून, रात्री उशिरापर्यंत रकमा काढण्यासाठी अनेक खातेदार बँकेच्या शाखेसमोर ठाण मांडून बसले होते.
बीड येथे मुख्य शाखा असलेल्या ज्ञानराज मल्टिस्टेट बँकेची पैठण येथील परदेशीपुरा भागात शाखा आहे. महाराणा प्रताप चौकात असलेल्या या बँकेत शेकडो खातेदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. बँकेचे चेअरमन उद्योग समूहाची आयकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे. समूहाच्या विविध विभागांचे हे अधिकारी झाडाझडती घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर पैठणच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेबाबत आज अफवा सुरू झाल्या. आणि एकाच वेळी शेकडो खातेदारांनी शाखेत गर्दी केली. जो तो ‘आमची ठेव आजच काढून घ्यायची.’ असे म्हणत होता. मुख्य बाजारपेठेत ही शाखा असल्याने खातेदारांच्या दुचाकी व चारचाकी वाहने आडवीतिडवी लावण्यात आली. परिणामी वाहतूक ठप्प झाली.



























































