अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते? गैरसमज दूर करा; रोज 2 अंडी खाल्ल्यास शरीरात होतात मोठे बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडी खाण्याबाबत अनेक वर्षांपासून लोकांमध्ये संभ्रम आहे. काही जण अंड्यांना उत्तम प्रथिनांचा स्रोत मानतात, तर काहींना वाटते की अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते. मात्र, तज्ज्ञ आणि संशोधनानुसार, संतुलित आहार घेत असलेल्या बहुतेक निरोगी लोकांसाठी दररोज दोन अंडी खाणे फायदेशीर ठरू शकते. एका मोठ्या अंड्यात साधारण 70 ते 72 कॅलरीज आणि जवळपास ६ ग्रॅम प्रथिने असतात. त्याशिवाय कोलीन, बी-व्हिटॅमिन्स, ल्युटीन आणि झियाझॅन्थिन यांसारखी महत्त्वाची पोषकतत्त्वेही असतात. ही घटक मेंदू, डोळे आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जातात.

प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे अंडी खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि वारंवार खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.

दररोज सकाळी दोन अंडी खाण्यास सुरुवात केल्यास काही दिवसांतच शरीरात सकारात्मक बदल जाणवू शकतात. अंडी हळूहळू पचत असल्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकते आणि सतत काहीतरी खाण्याची गरज कमी होते. विशेषतः साखरयुक्त सीरियल्स, पेस्ट्री किंवा पांढऱ्या ब्रेडऐवजी अंडी खाल्ल्यास सकाळच्या वेळची भूक आणि स्नॅक्स खाण्याची सवय कमी होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, अंड्यांमधील कोलेस्ट्रॉलपेक्षा ट्रान्स फॅट आणि जास्त सॅचुरेटेड फॅट असलेले पदार्थ आरोग्यास अधिक हानिकारक ठरतात. त्यामुळे अंड्यांसोबत काय खाल्ले जाते, हे अधिक महत्त्वाचे मानले जाते.

अंडी भाज्या, ओट्स, होल-ग्रेन टोस्ट, बीन्स किंवा अ‍ॅव्होकॅडोसारख्या पौष्टिक पदार्थांसोबत खाल्ल्यास संतुलित आहार तयार होतो. मात्र, बेकन, सॉसेज, अतिरिक्त लोणी, चीज आणि रिफाइंड ब्रेडसारखे पदार्थ नियमित खाल्ल्यास हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

मधुमेह, उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल किंवा कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास असलेल्या लोकांनी अंडी किती प्रमाणात खावीत याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही संशोधनांमध्ये मधुमेही व्यक्तींमध्ये जास्त अंडी खाणे आणि हृदयरोगाचा धोका यांचा संबंध आढळल्याचेही सांगितले जाते.