
देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील कल्याणपूर येथील आपले राहते घर विकले आहे. राष्ट्रपदीपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ते या घरी गेले नव्हते. त्यामुळे त्यांनी हे घर विकण्याचा निर्णय घेतला. कानपूरमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टर दाम्पत्याने हे घर खरेदी केले आहे.
माजी राष्ट्रपतींचा वावर राहिलेले हे घर विकत घेतल्यामुळे श्रीती बाला आणि शरद कटियार या डॉक्टर दाम्पत्याला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. शुक्रवारीच या घराची त्यांच्या नावावर नोंदणी झाली. कानपूरच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ही नोंदणी झाली असून रामनाथ कोविंद यांनी पॉवर ऑफ अटॉर्नीचा अधिकार आनंद कुमार यांना दिला होता. शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीमध्ये हे घर डॉक्टर दाम्पत्याच्या नावावर झाले.
डॉ. शरद यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझे सौभाग्य आहे की मला या घरामध्ये राहण्याची संधी मिळाली. रामनाथ कोविंद यांच्या कृपेमुळेच हे घर आपल्याला मिळाले असून संपत्तीच्या नजरेने त्याकडे पाहू नका असेही ते म्हणतात. तसेच घरासाठी मोजलेली किंमतही ते सांगत नाहीत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या घरासाठी 1.80 कोटी मोजल्याचे समजते.
बाला दाम्पत्याचे बिल्होरमध्ये खासगी रुग्णालयात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये रामनाथ कोविंद यांची भेटही घेतली होती.

रामनाथ कोविंद यांचे हे घर कल्याणपूरमधील इंग्रानगर दयानंद बिहारमध्ये एम ब्लॉकमध्ये होते. राष्ट्रपती झाल्यानंतर ते या घराकडे फिरकलेही नव्हते. प्रोटोकॉल अंतर्गत येथे पोलिसांचे एक पथक कायम तैनात असायचे. सध्या रामनाथ कोविंद यांना सरकारकडून परंपरेनुसार एक बंगला मिळाला असून संपूर्ण कुटुंबासह ते तिथेच राहतात.



























































