
विजया वाड,[email protected]
डॉ. कणेकरांचा मुलगा. शिरीष कणेकरांच्या लेखणीचे एक वेगळेच रूप या पुस्तकातून पाहायला मिळते.
‘शिरीष कणेकरांचे कुठेही काही छापून आले की मी ते आवर्जून वाचतो, कारण वाचताना त्यांचे शब्द ऐकू येतात’ हे उद्गार आहेत सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांचे.
खुमासदार शब्दात वाचकांची मने वर्षानुवर्षे जिंकणारे शिरीष कणेकर माय-बापाबद्दल बोलताना हळवे होतात नि वाचताना आपलेही डोळे ओले होतात. ‘डॉ. कणेकरांचा मुलगा’ यातला एक लेख…
‘15 मार्च 1966’ या दिवशी कणेकरांचे वडील, अण्णा गेले. त्या लेखाच्या शेवटी ते लिहितात, ‘माझ्या मुलाला अण्णांचं नाव ठेवण्याची सूचना आली तेव्हा ती मी तत्काळ फेटाळून लावली. त्या नावाचा माझ्या आयुष्यात एकच माणूस झाला, आहे व राहील. देअर शॅल बी ओन्ली वन.
डॉ. मधुकर भास्कर कणेकर खलास.’ ही भावना इतकी उत्कट आत्मियतेने उतरली आहे ना की प्रत्येकास आपला बाप आठवावा. हे पुस्तक कणेकरी शैलीतले फार हळवे तसेच अगदी खटय़ाळ खोडकर क्षण टिपणारे नितांत सुंदर पुस्तक झाले आहे. कणेकर आपल्या आईला फार लवकर हरवून बसले. नंतर आईच्या आईने या तीन वर्षांच्या मुलाला सांभाळले. ते लिहितात, ‘आजी गं, नखात रोग नसलेली माझी आई सव्वीसाव्या वर्षी एका सकाळी जगातून निघून जाते आणि कशामुळे गेली हेदेखील कोणाला कळत नाही? नवरा डॉक्टर असताना? कारण शोधायचाही प्रयत्न नाही केलात?’
‘माझी आजी दात आवळून निशब्द बसून राहिली. फक्त तिच्या भुवया थरथरत होत्या. आता जवळजवळ दृष्टीहीन झालेले तिचे पांढुरके डोळे जास्त सैरभैर झाले.’ ती म्हणाली काहीच नाही. मीच बोललो, ‘कदाचित माझ्याच पायगुणाने ती गेली असेल. लहानपणी तू म्हणायचीस ना, मी आईला गिळलं म्हणून’ एकाएकी माझ्या आजीचा बांध फुटला. जर्जर झालेला तिचा देह थरथरायला लागला. लहान मुलीसारखे हुंदके देत ती म्हणाली, ‘माझी पोरगी गेली रे! मीच कैदाशीण आहे. मीच गिळले सगळय़ांना माझा दहा वर्षांचा एकुलता मुलगा गेला, तुला माझ्या फाटक्या पदरात टाकून तुझी आई गेली. आता तुझे वडीलही गेले. मी खरी चांडाळीण आहे. अजून जगतेच आहे.’
‘मी तोंडातून शब्द काढला नाही. बोललो असतो तर आवाजानं दगा दिला असता. माझ्या डोळय़ांना धार लागली होती. माझे डोळे परत परत भरून येत होते, ते सर्वस्व गमावून बसलेल्या नि तरीही जगण्याचा शाप मिळालेल्या माझ्या आजीसाठी की जिचा चेहराही आठवत नाही त्या आईसाठी याचं मला भान नव्हतं.’
चहाटळकी, इरसालकी, चापलुसकी, लगावबत्ती अशी पुस्तके लिहिणाऱया कणेकरांचे आई-बापावरले हृदयंगम लेख इतके हृदयंगम झाले आहेत की, ‘डॉ. कणेकरांचा मुलगा’ हे पुस्तक मनात रुतून बसावे.
या पुस्तकातील स्मृतिचित्रे, अण्णा, आईवेगळा हे लेख वाचाच! ‘सुपुत्री’ फारच बहारदार आणि धमाल खास कणेकरी शैलीतला लेख. तसेच माझी मुलं आणि मी एकदम टची.
हे आत्मचरित्र नाही. पण स्वतःभवतीच्या वर्तुळाच्या परीघाचे सुंदर शब्दांकन आहे. कणेकरीचे प्रयोग लोकप्रिय करणाऱया, पत्रकारितेत ‘जमाना’ घालविलेल्या आणि लेखणीस आपली मैत्रिण मानणाऱया कणेकरांचे हे पुस्तक 2003 या वर्षात दिलीप वामन काळे यांना दिलीप प्रकाशनातर्फे प्रकाशित केले आहे. अवश्य वाचा रसिकांनो ‘डॉ. कणेकरांचा मुलगा’.
डॉ. कणेकरांचा मुलगा
लेखक – शिरीष कणेकर
प्रकाशक – दिलीप वामन काळे, दिलीप प्रकाशन
पृष्ठ – 246 किंमत – रु. 200
























































