#corona म्हणजे ‘चायनीज फॅड’ म्हणणाऱ्या डॉक्टरला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमधून संपूर्ण जगभरात फैलावलेल्या कोरोना व्हायरसचं संकट परतवून लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना स्वच्छता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण, मुंबईतल्या एका डॉक्टरने कोरोना व्हायरस हे चायनीज फॅड असल्याचं म्हणत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल (एमएमसी)ने नोटीस पाठवली आहे. कोरोनाविषयी दिशाभूल करण्यासाठी एखाद्या डॉक्टरला नोटीस बजावण्याची घटना प्रथमच घडली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अनिल पाटील असं या डॉक्टरचं नाव आहे. मुंबईतील दादर परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या या डॉक्टरविरोधात एमएमसीने नोटीस बजावली आहे. एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमसीकडे नोंदणीकृत असलेले डॉक्टर केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आरोग्यविषय मार्गदर्शक तत्वे आणि सूचनावली यांच्याविरोधात जाऊ शकत नाहीत. डॉ. पाटील यांनी अनेक समाज माध्यमांवर कोरोनाची भीती व्यर्थ असून कोरोना हे चायनीज फॅड असल्याचं म्हटलं आहे. हे फॅड फक्त मास्क खपवण्यासाठी आणि कोरोनाच्या लसी विकण्यासाठी काढलं आहे. तसेच जसा सार्स नावाचा विषाणू हिंदुस्थानी नागरिकांवर काहीच परिणाम करू शकला नव्हता, तसंच कोरोनाही हिंदुस्थानच्या उष्ण हवामानात टिकाव धरू शकणार नाही, असा दावा पाटील यांनी केला आहे.

डॉ. अनिल पाटील यांचं हे विधान अतिशय बेजबाबदार असून त्यामुळे समाज माध्यमांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. जर त्यांचा सल्ला ऐकून लोकांनी खबरदारी घेतली नाही, तर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असं उत्तुरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांना नोटीस पाठवून आम्ही स्पष्टीकरण मागवलं होतं. त्यांचं स्पष्टीकरण आमच्याकडे आलं असून ते समाधानकारक उत्तरं देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा विचार करत असल्याचंही उत्तुरे यांचं म्हणणं आहे. शिवाय, डॉ. पाटील यांच्याकडे एमबीबीएस ही पदवी आहे. मात्र, ते एक वेलनेस क्लिनिक चालवतात आणि स्वतःला आयुर्वेदिक डॉक्टर म्हणवतात. त्यावरही आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं उत्तुरे यांनी स्पष्ट केलं आहे. अशाप्रकारे जर कोणताही डॉक्टर चुकीची माहिती अगर अफवा पसरवत असेल तर नागरिकांनी त्वरित एमएमसीकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात येत आहे.