
वर्धा जिह्यातील देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना केलेल्या शिवीगाळीच्या मुद्यावरून राज्यातील वैद्यकीय अधिकायांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणाऱया महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने (मॅग्मो) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. आमदार रणजित कांबळे यांच्याविरोधात कठोर कारवाई न केल्यास डॉक्टरांना कठोर पावले उचलावी लागतील असा इशारा ‘मॅग्मो’ने दिला आहे.
देवळी तालुक्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे सत्र आयोजित केले होते. त्यावेळी आमदार रणजित कांबळे यांनी मोबाईलवरून शिवीगाळ केल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे. आमदार रणजित कांबळे यांनी देवळी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना मोबाईलवरून दमदाटी, अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड, सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार व अन्य डॉक्टरांनी सांगितले.
80 टक्के लोकांना वैद्यकीय सेवा
मॅग्मोचे दहा हजार सदस्य असून राज्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात हे डॉक्टर्स वैद्यकीय सेवा देतात. या डॉक्टरामार्फत राज्यातील 75 ते 80 टक्के लोकांवर उपचार करतात. त्यामुळे हे डॉक्टर्स संपावर गेले तर कोरोना काळात वैद्यकीय सेवेला मोठा फटका बसण्याची भीती आहे.




























































