शस्त्रक्रियेवेळी तरुणीवर डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला सामूहिक बलात्कार, पीडित तरुणीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शस्त्रक्रियेकरिता रुग्णालयात दाखल झालेल्या एका तरुणीवर डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या चुलत भावाने या प्रसंगाचा व्हिडीयो तयार करून तो सर्वत्र व्हायरल केल्यामुळे ही घटना पोलिसांना कळली.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेकरिता एका तरुणीला दाखल करण्यात आले होते. या तरुणीला 1 जून रोजी रात्री 11 वाजता शस्त्रक्रिया करण्याकरिता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर तिला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते, मात्र ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर ही तरुणी त्रासलेली दिसत होती. तसेच ती काहीही बोलण्याच्या अवस्थेतही नव्हती. तिला याविषयी विचारले तेव्हा तिला काहीच सांगता येत नव्हते. याकरिता तिच्या चुलत भावाने तिला कागद आणि पेन लिहायला दिले.

तेव्हा तिने ‘इथले डॉक्टर्स चांगले नाहीत. माझ्यावर शस्त्रक्रिया केली नाही. याऐवजी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी मिळून सामूहिक बलात्कार केला’, असे तिने कागदावर दिले. त्यानंतर तिच्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा व्हिडियो सर्वत्र व्हायरल झाला आणि पोलिसांना ही घटना कळली. तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित तरुणीच्या नातेवाईकांकडे या घटनेबाबत चौकशी केली, मात्र त्यांच्याकडून याबाबत कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही.

पोलिसांनी महाविद्यालयातील डॉक्टरांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पीडितेला न्याय मिळवून देण्याकरिता दोन पथकांची नेमणूक केली आहे. या प्रकरणाबाबत तपास होण्याआधीच पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.